ऑर्थर रोड तुरुंगातील कैद्यांना गरम जेवण 

मंगेश सौंदाळकर
मंगळवार, 4 एप्रिल 2017

मुंबई - चिंचपोकळीतील मुंबई मध्यवर्ती तुरुंगात (ऑर्थर रोड) आता कैद्यांना ताजे, गरम जेवण मिळत आहे. एका सामाजिक संस्थेने तुरुंग प्रशासनाला 18 डबे दिले आहेत. त्यातील जेवण चार तास गरम राहत असल्याने कैदीही खुषीत आहेत. कैद्यांना पौष्टिक आहार मिळावा, याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. 

गृह विभागाच्या अखत्यारीत राज्यातील नऊ मध्यवर्ती, 31 जिल्हा, 13 खुले, एक खुली वसाहत आणि 172 उपतुरुंग आहेत. पुणे आणि मुंबईत महिलांकरता स्वतंत्र तुरुंग आहेत. मुंबईत ऑर्थर रोड तुरुंग महत्त्वाचा मानला जातो. या तुरुंगात 830 कैदी राहू शकतात. सध्या 18 बराकींत दोन हजार 756 कैदी राहत आहेत. एवढ्या कैद्यांचे जेवण बनवणे म्हणजे तुरुंग प्रशासनाची तारेवरची कसरत असते. तुरुंगातील मध्यवर्ती भटारखान्यात सायंकाळी 4.30 वाजता जेवण बनवून तयार होते. त्यानंतर 5.15 वाजता प्रत्येक बराकीत जेवण वाटप करण्यास सुरुवात होते. 6.30 वाजता अधिकारी तुरुंगात फेरी मारून त्याविषयी अहवाल तयार करतात. रात्री 7.30 वाजता कैद्यांना जेवण दिले जाते. त्यामुळे जेवण थंड होते. याबाबत काही कैद्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. याची दखल तुरुंग प्रशासनाने घेतली. 

आता एका सामाजिक संस्थेने तुरुंग प्रशासनाला 18 डबे दिले आहेत. त्या डब्यांत आमटी आणि भाजी ठेवली जाते. गरम जेवण मिळत असल्याने कैदी आनंदात असल्याचे तुरुंग प्रशासनाने सांगितले. 

कैद्यांना पौष्टिक आहार मिळावा याकरता तुरुंग प्रशासन विचार करत आहे. त्याकरता वरिष्ठ स्तरावर अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. मेअखेर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे समजते. 

कैद्यांना गरम जेवण मिळावे, याकरिता एका सामाजिक संस्थेने जेवणाचे डबे दिले आहेत. गरम जेवण मिळत असल्याने कैदीही आनंदात आहेत. 
- हर्षद अहिरराव, वरिष्ठ अधिकारी, ऑर्थर रोड तुरुंग 

Web Title: Arthur Road Jail prisoners hot meals