
पक्ष चालवणे वेगळी गोष्ट आणि राज्याचे नेतृत्व करणे वेगळे, अशी शेरेबाजी सात्तत्याने भाजपकडून होते. आज वर्षभरानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिल्यास भाजपसारख्या विरोधी पक्षाला ते पुरुन उरले आहेत, असेच म्हणावे लागेल
बैठक झाली..शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला..आणि अचानक आक्रित घडलं..पहाटेच्या शपथविधीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अजित पवार यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतरच्या चार दिवसांत अशा काही घटना घडल्या की, पुन्हा अजितदादा स्वगृही परतले. फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. अखेर राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळवून देण्याचा शब्द दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरे यांना हे पद स्वीकारावे लागले. उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यापासून भाजपकडून सातत्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि अजूनही केले जात आहेत. प्रशासनाचा कोणताही अनुभव नसलेले उद्धव ठाकरे यांना राज्य सरकारचा कारभार झेपेल काय ? असे प्रश्न भाजपच्या नेत्यांकडून विचारले जाऊ लागले. पण सत्ता हातात घेतल्यानंतर तीन महिन्यातच कोरोना, निसर्ग चक्रीवादळ अशा संकटांना महाविकास आघाडी सरकारला सामोरे जावे लागले. या काळात उद्धव ठाकरे यांनी आपली कार्यक्षमता दाखवून दिल्याचे दिसते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचा फरक संपूर्ण राज्याला दिसून आला. शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षाचे नेतृत्त्व करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा संयम जनतेला पाहायला मिळाला.
पक्ष चालवणे वेगळी गोष्ट आणि राज्याचे नेतृत्व करणे वेगळे, अशी शेरेबाजी सात्तत्याने भाजपकडून होते. आज वर्षभरानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिल्यास भाजपसारख्या विरोधी पक्षाला ते पुरुन उरले आहेत, असेच म्हणावे लागेल. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. मुंबईत धारावीतील परिस्थिती बिकट बनली होती. परंतु, योग्य नियोजन, संयमी नेतृत्त्वाने महाराष्ट्राची स्थिती इतर राज्यांपेक्षा लवकरच आटोक्यात आली.
हेही वाचा- भाजपला हादरवून सोडणारे ठाकरे सरकारनं घेतलेले 5 निर्णय
कोरोना काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने राज्यातील जनतेशी संवाद साधला. एक कुटुंबप्रमुख जसा आपल्या कुटुंबाची काळजी घेतो. त्या पद्धतीने त्यांनी संवाद साधला. उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडत नाहीत असाही त्यांच्यावर सातत्याने आरोप करण्यात येत होता. त्यालाही त्यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले. ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तत्पूर्वी, राज्यावर आर्थिक संकट असतानाही लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यांच्या या निर्णयाचे मोठे कौतुक केले जाते.
विरोधी पक्षाकडून सातत्याने आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या वर्षभरात ठाकरे कुटुंबावरही आरोप करण्यात आले. या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा संयम राखण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येते. शिवसेनेच्या हिंदुत्त्वाबद्दल शंका उपस्थित करण्यात आली. काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेने हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केले.
या सर्व गोष्टींचा समाचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आपली भूमिका आक्रमकपणे मांडली. विरोधकांना त्यांनी अंगावर घेतले. आपल्या भाषणात त्यांनी राज्यपालांचे नाव न घेता टीका केली. काहींना तर त्यांची टीका इतकी जिव्हारी लागली की अजूनही ते या धक्क्यातून सावरु शकलेले नाहीत.
हेही वाचा- ED आणि CBI वर निशाणा साधणारं संजय राऊतांचं ठाकरी पद्धतीचं विशेष व्यंगात्मक ट्विट
कोरोनाच्या धक्क्यातून सावरत राज्यातील आर्थिक डोलारा पुन्हा पूर्वपदावर आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात त्यांना थोड्याफार प्रमाणात यश येतानाही दिसत आहे. राज्यातील मंदिरं, मशीद भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय जाहीर करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'ही श्रींची इच्छा' असे म्हटले होते. उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने वर्षभरात राज्यशकट हाकला ते पाहता '...हीच तर श्रींची इच्छा' होती असे म्हणावे लागेल. येणारे दिवस उद्धव ठाकरे यांच्यासाठी आव्हानात्मक आहेच. त्याचा सामना ते कसा करतात, हे येणारा काळच ठरवेल.