आभासी नव्हे; वर्तमानात जगा!

ओंकार धर्माधिकारी
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

तंदुरुस्त मानसिक आरोग्यासाठी...
चांगले वाचन, संगीत ऐकणे. 
मित्र, पालक, कुटुंबीय यांच्याशी संवाद साधावा. 
वर्तमानाचाच विचार करावा. 
जीवनात येणाऱ्या अडचणी सोडवण्यावर भर द्या. 
खुलेपणाने व्यक्त व्हा, भावना दाबून ठेवू नका. 
योगाभ्यास, मैदानावरील खेळ नियमित खेळा. 
७ ते ८ तास नियमित झोपा. 

हे आवर्जून टाळावे
मुलांनी व्हिडिओ गेमचा अतिरेक टाळावा. 
मोबाईल फोनचा अनावश्‍यक वापर थांबवावा.
आभासी जगात न रमता वास्तवात जगावे. 
कोणतेही व्यसन टाळावेच.

मानसिक आरोग्याचे प्रश्‍न दिवसेंदिवस जटिल होतात. मानसिक ताण हाताळता न येणे, मनातील भावना व्यक्त न करणे, सतत भविष्याची चिंता यामुळेही मानसिक स्वास्थ्य बिघडतंय; पण सोशल मीडिया, व्हिडिओ गेम्सच्या अतिरेकामुळे मनोविकार बळावताहेत. आभासी जगात नव्हे, तर वर्तमानात जगणे हे सुदृढ मानसिक आरोग्यासाठी आवश्‍यक असल्याचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ देत आहेत.

एखादा प्रचंड क्षमतेचा खेळाडू, प्रतिथयश कलाकार आत्महत्या करतो, त्या वेळी मानसिक ताण-तणाव लोकांच्या चर्चेचा विषय बनतो; पण मुळात बहुतांशी मनोविकारांचे कारण हे स्वतःमध्येच असते. सध्या सोशल मीडिया असाच एक प्रकार आहे, जेथे अनेकजण रममाण होतात; पण त्यामुळे सभोवतीच्या माणसांबरोबरचा संवाद कमी होतो. एकलकोंडेपणा येतो. चारचौघांत व्यक्त होता येत नाही. मनातील भावना मांडता येत नाहीत. त्यातून ताण निर्माण होतो. नैराश्‍य येतं. तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापरही मनोविकारांना कारणीभूत आहे.

मानसिक आजार व लक्षणे
ॲन्झायटी न्युरोसिस - सतत चिंता वाटणे, प्रचंड भीती वाटून दडपण येणे.
अर्धशिशी - कपाळ आणि कानशिलाचा भाग दुखणे, जुनाट डोकेदुखी. 
सोमॅटायझेशन - वारंवार अशक्तपणा येणे, कंबरदुखी, सांधेदुखी, मरगळ वाटणे. 
मुलांमधील वर्तणुकीच्या समस्या - आत्मविश्‍वासाचा अभाव, अतिहट्ट, चंचलपणा, एकाग्रता नसणे.
सायकोसिस (वेडेपणा) - स्वतःशीच पुटपुटणे, असंबद्ध बडबडणे, भास होणे. 
डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश) - विस्मरण, चिडचिडेपणा, लहान सहान गोष्टी विसरणे. 
व्यसनातून होणारे विकार - हातपाय कापणे, नैराश्‍य येणे. 
डिप्रेशन - नकारात्मक विचार येणे, भूक व झोप कमी होणे. 

भविष्याची अनावश्‍यक चिंता न करता वर्तमानात जगणे आवश्‍यक आहे. ताण कधीच टाळता येत नाही; पण त्याचा सकारात्मक उपयोग केला पाहिजे. सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा. योग्य वेळी आहार आणि ७ ते ८ तासांची नियमित, शांत झोप घेणे गरजेचे आहे. प्राणायाम, योग नियमितपणे केल्यास मानसिक आरोग्य चांगले राहते. त्रास होत असल्यास मानसोपचार तज्ज्ञांकडे निःसंकोचपणे जावे.
- डॉ. अश्‍विन शहा, मानसोपचार तज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article omkar dharmadhikari