साहेबांनी हात उंचावताच अडले पाणी; अन् शेतकरी सुखावला

विकास गाढवे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

धरणजोड प्रकल्पाची संकल्पना असलेल्या रायगव्हाण फिडर कालव्याला क्षणाधार्थ मंजूरी
 

लातूर : दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात लातूरकरांसाठी पावलापावलावर `राजा बोले अन् दल हले`चा अनुभव येत असे. या शैलीतून विलासराव देशमुख यांनी लातूरकरांसाठी अनेक प्रकल्प मंजूर केले. भिसेवाघोली (ता. लातूर) येथे नागरी सत्कारप्रसंगी माजी सरपंच राजेसाहेब पाटील यांनी मांजरा धरणातील पाणी रायगव्हाण प्रकल्पात आणण्यासाठी धरणजोड प्रकल्पाची मागणी त्यांनी क्षणाधार्थ मंजूर केली.

घोषणेनंतर या रायगव्हाण फिडर कालव्यासासाठी 56 कोटी तर सर्वेक्षणासाठी एक कोटीचा निधी लगेच मंजूर केला. मात्र, साहेबांच्या निधनानंतर या धरणजोड प्रकल्पाकडे कोणीच पाहिलेच नसल्याची खंत पाटील यांना आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी साहेब (विलासराव देशमुख) नेहमी सतर्क होते. यासाठी आणलेल्या संकल्पना त्यांनी लागलीच स्वीकारून त्या अंमलात आणल्या. यातूनच मांजरा नदीवर आठ ठिकाणी उच्चस्तरीय बंधाऱ्यांची (बॅरेजेस) उभारणी झाली. काही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे रूपांत्तर बॅरेजेसमध्ये झाले.

मांजरा धरण भरल्यानंतर नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी या आठ बॅरेजेसमध्ये साठवण्यात येते. बॅरेजेसमुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना बारमाही पाणी उपलब्ध झाले. याच धर्तीवर माजी सरपंच पाटील यांनी धरणजोड प्रकल्पाची संकल्पना मांडली. सन 2007 मध्ये भिसेवाघोलीत आयोजित नागरी सत्कारात त्यांनी मांजराच्या अतिरिक्त पाण्यावर हक्क सांगत मांजरा धरणातील अतिरिक्त पाणी रायगव्हाण मध्यम प्रकल्पात आणण्याची मागणी केली.

मांजरा धरण भरते तेव्हा अनेकदा रायगव्हाण प्रकल्प कोरडाठाक नसल्याचे त्यांनी देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले. देशमुख यांनी पाटील यांची मागणी उचलून धरत योजनेला लागेच मंजूर दिली. यातूनच रायगव्हाण फिडर कालव्याला जलसंपदा विभागाने मंजूरी दिली. प्रकल्पाला 56 कोटीचा निधी मंजूर करत एक कोटी रूपये सर्वेक्षणाला मंजूर केले. मात्र, साहेबांच्या निधनानंतर सर्वेक्षणानंतर कालव्याचे काम पुढे गेले नाही.

साहेब असते तर कालव्याचे काम तडीस जाऊन लातूर तालुक्याच्या ग्रामीण भागाला पाणीटंचाई भासली नसती, असे पाटील यांनी सांगतात. सांगली व कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरानंतर सातत्याने धरण व नद्या जोड प्रकल्पाची चर्चा सुरू आहे.. मात्र, साहेबांनी तेव्हाच ही संकल्पना पुढे आणली होते, असेही पाटील म्हणाले.  

हात उंचावताच अडले पाणी
कधी काळी मांजरा धरणाची उंची एकमीटरने वाढवली होती. बॅकवॉटरचे पाणी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने उंचीएवढा 225 दशलक्ष घनमीटर पाणी धरणात साठवले जात नव्हते. 200 दशलक्ष घनमीटरचाच पाणीसाठा केला जात होता. 2007 मध्ये पावसाळ्यात धरण भरून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते.

विलासराव देशमुख यांनी धरणावर जाऊन अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न सोडवला. शेतकऱ्यांना पिकासह मावेजा देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी उंचीएवढे पाणी अडवण्यास होकार भरताच धरणावरच देशमुख यांनी हात उंचावले. त्यानंतर धरणाचे गेट बंद करून उंचीएवढे पाणी साठवण्यात आले. काही वेळातच धरणात जादा 25 दशलक्ष घनमीटर पाणी साठवले गेले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on Vilasrao Deshmukh death anniversary