झुंडशाहीपुढे झुकणे अशोभनीय : अरुणा ढेरे

सुशांत सांगवे
शनिवार, 12 जानेवारी 2019

"साहित्याशी किंवा भाषेच्या जाणत्या प्रेमाशी ज्यांचा सुतराम संबंध नाही, अशा कोणा समूहाने, झुंडशाहीने दिलेल्या धमक्‍यांपुढे वाकणे हे मुळीच शोभनीय नाही. यामुळे केवळ साहित्य महामंडळ आणि संयोजन समितीच्याच नव्हे, तर सगळ्या मराठी साहित्य रसिकांच्या माना खाली गेल्या आहेत,

यवतमाळ : "साहित्याशी किंवा भाषेच्या जाणत्या प्रेमाशी ज्यांचा सुतराम संबंध नाही, अशा कोणा समूहाने, झुंडशाहीने दिलेल्या धमक्‍यांपुढे वाकणे हे मुळीच शोभनीय नाही. यामुळे केवळ साहित्य महामंडळ आणि संयोजन समितीच्याच नव्हे, तर सगळ्या मराठी साहित्य रसिकांच्या माना खाली गेल्या आहेत,'' अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी निमंत्रणवापसीबाबत आयोजकांना आणि त्यांच्यावर दबाव आणणाऱ्यांना बजावले. लेखकांचा आवाज दाबून टाकणाऱ्यांचा विरोध झालाच पाहिजे, असेही त्या स्पष्टपणे म्हणाल्या. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या वतीने आयोजित 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ. ढेरे या काय बोलणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. निमंत्रणवापसीबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी आपल्या स्वभावातील दुर्गावतारच या वेळी दाखवून दिला. आजूबाजूची बदलते वातावरण, साहित्यातील गढूळता अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी अंजन घालत, कवितांची पेरणी करत, इतिहासाचे दाखले देत केलेल्या भाषणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. 

माझ्या मराठीची बोलू कौतुके या सुरेल गीताने संमेलनाची सुरवात झाली. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले. या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष विद्या देवधर, स्वागताध्यक्ष मदन येरावार, कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते, नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलिस अधिक्षक एम राजकुमार आदी मान्यवर उपस्थित होते. 

डॉ. ढेरे म्हणाल्या, ""नयनतारा सहगल यांना आपण आमंत्रित केले होते. अखिल भारतीय मराठी माणसांच्या वतीने त्यांना आमंत्रण दिले होते. पण आपण त्यांना पाठवलेले आमंत्रणच अनुचित पद्धतीने रद्द केले. ही अतिशय नामुष्कीची आणि निषेध करण्याची गोष्ट आहे. आपल्या घरातल्या एखाद्या मंगलकार्याची पत्रिका घेऊन एखाद्या मान्यवराकडे किंवा एखाद्या प्रतिष्ठित नातलगाकडे जाऊन आमंत्रण पत्रिका देऊन "अगत्य येण्याचे करावे', असे कळवावे आणि नंतर पुन्हा आपणच येऊ नये असे कळवावे हे त्यांच्यासाठी अपमानास्पद आणि आपल्यासाठी लाजिरवाणीच गोष्ट आहे. संयोजकांडून ही गंभीर चूक घडली यात शंकाच नाही. संमेलन हे सध्याच्या परिस्थितीत सतत साहित्यबाह्य गोष्टींच्या हातात जाण्याचा धोका असताना ही जोखीम पुरेशा समजशक्तीनेच उचलली गेली पाहिजे, ही काळाची गरज संयोजकांना ओळखता आली नाही. 

"झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करत असेल, तर आपण केवळ नमते घेऊन टीकेचे धनी होण्याचा मार्ग स्वीकारणार का,'' असा सवाल उपस्थित करून त्या म्हणाल्या, या धमक्‍या बळाच्या जोरावर का होईना, कोणत्याही विधायक गोष्टीचा आग्रह धरणाऱ्या नव्हेत. साहित्याशी किंवा मराठीच्या जाणत्या प्रेमाशी ज्यांचा सुतराम संबंध नाही, अशा कोणत्याही समूहाच्या धमक्‍यांपुढे वाकणं ही अशोभनीय आहे. केवळ राजकीय शक्तींनीच नव्हे, तर कोणत्याही सार्वजनिक सत्तांनी विशिष्ट जाती धर्माच्या पाठीशी उभे राहणे हे केव्हाही स्वीकारार्ह नाही. निधर्मी लोकशाहीत आपण त्याचा कडवा निषेध केला पाहिजे.'' 

"धर्म, परंपरा आणि संस्कृतीच्या नावाखाली झुंडशाही धुमाकूळ घालत असताना भारतीयत्वाच्या प्राणभूत संकल्पनांवरील आपले लक्ष विचलित करणारे छुपे राजकीय, सामाजिक, आर्थिक किंवा इतर घातक उद्देश पुढे नेत असेल, तर त्या प्रयत्नांचे अस्तित्व आणि स्वरूपही आपण ओळखले पाहिजे,'' असेही त्या म्हणाल्या. 

Web Title: Aruna Dhere talks at Marathi Sahitya Sammelan