Asha Bhosle Birthday : लखलखत्या सुरांची नव्वदी

आजही वाटते आशा भोसले म्हणजे लखलखत्या सुरांची नव्वदी... तडफदार लावणीतल्या धमाकेदार शब्दांची नव्वदी...
asha bhosle 90th birthday ashok palki wishes music
asha bhosle 90th birthday ashok palki wishes music sakal

- अशोक पत्की, संगीतकार

आजही वाटते आशा भोसले म्हणजे लखलखत्या सुरांची नव्वदी... तडफदार लावणीतल्या धमाकेदार शब्दांची नव्वदी... हळुवार रोमांचित करणारी शब्दफेरीचा नव्वदी... आशाताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम आणि शुभेच्छा!

आशा भोसले आज नव्वदीत पदार्पण करीत आहेत. ही दशके फक्त वयाचीच नव्हेत तर सळसळत्या स्वरांचा महासागर असलेला, मन प्रसन्न करणारा स्वर, मनाला स्वरांच्या माध्यमातून उभारी देणारा आवाज म्हणजे आशा भोसले.

मी पाच -सहा वर्षांचा असेन. माझ्या बाबांनी मला माझ्या ताई आत्याकडे शिक्षणासाठी शिवाजी पार्क रोड नं. पाच येथे ठेवले होते. माझी गोपी टॅंक म्युनिसिपल शाळा समोरच्या गल्लीत होती. शाळेच्या बाजूलाच अल्ट्रा सोसायटी होती. तिथे आशाताई, उषाकिरण, सीमा देव राहायला होत्या. टॅक्सी पकडायला सर्वजण नाक्यापर्यंत यायचे. तेवढंच या मोठ्या लोकांचे दर्शन व्हायचे.

नाक्यावर इराण्याचे हॅाटेल होते. तिथून तिसऱ्या बिल्डिंगमध्ये संगीतकार जयकिशन राहायचा. शिवाजी पार्कच्या त्या बाजूला सुधीर फडके आणि सी. रामचंद्र राहायचे. या सर्वांचे दिवसातून एकदातरी दर्शन व्हायचे.

मला संगीताची आवड असल्यामुळे आशाताई दिसल्या की मन भरून यायचे. बाबूजींनी आशाताईंकडून विविध प्रकारची गाणी गाऊन घेतली होती. बाबूजी आणि आशाताई म्हटले की काही चित्रपट पटकन आठवतात. ‘मुंबईचा जावई’, ‘प्रपंच’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘सुहासिनी’, ‘एक धागा सुखाचा’ आदी.

फक्त भावगीते नव्हेत तर लावणी वजा गाणीही राम कदम, विश्वनाथ मोरे, अनिल-अरुण, आनंदघन वगैरेंनी आशाताईंकडून गाऊन घेतली होती आणि ती सर्व गाणी आज पन्नास वर्षांनंतरही तरुण वाटतात.

शृंगारिक गाणी गाण्यासाठी आशाताईंचा हात कोणी धरू शकणार नाही. वडील दिनानाथांची नाट्यगीते हुबेहुब त्यांच्यासारखीच आशाजींनी गाऊन ठेवली आहेत. गदिमा, राम कदम व आशाताईंनी गायलेले ‘बुगडी माझी सांडली ग’ मधील ‘ग’ ची करामत, तसेच गदिमा, बाबूजी आणि आशाताई यांनी गायलेले ‘ पतंग उडवीत होते ग बाई मी पतंग उडवीत होते,’ हे गाणे ऐकताना आकाशात डोलणारा पतंग आठवतो.

विश्‍वास व प्रेम

‘आपली माणसं’ या मराठी चित्रपटासाठी मी संगीत दिलेले ‘नकळत असे ऊन मागून येते’ हे गाणे आशाजी आणि सुरेशजींनी गायले होते. एप्रिलमध्ये पेपरमध्ये नामांकने यायला सुरुवात होते. त्यात माझेही नाव होते.

ज्या दिवशी पुरस्कार सोहळा होता त्यादिवशी मी नवीन सिनेमाचे गाणे करीत होतो. आशाताईंना बोलावले होते. रिहर्सल करून त्या सिंगरबूथकडे जाताजाता एकदम थांबल्या आणि मला म्हणाल्या, ‘‘अरे आज पेपर वाचताना तुझे नाव वाचले. त्याच ‘नकळत’ गाण्याला नॅामिनेशन मिळाले का?,’’ मी हो म्हटले.

त्यावर त्या म्हणाल्या, की नक्की जा. खूप छान मेलेडियस गाणे बनवले आहेस. पुरस्कार तुलाच मिळेल बघ. ‘प्रतिस्पर्धी कोण आहे माहीत आहे का? जब्बार पटेलांचा ‘एक होता विदूषक’, ज्यात १६ गाणी आहेत, असे मी त्यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘तरीही मला वाटते, तू जावे’’. त्यांच्या सांगण्यावरून ‘रंगभवन’ला गेलो आणि तो पुरस्कार बाबूजींच्या हस्ते मिळाला.

आवाजातील फिरकत

सर्व मोठमोठ्या संगीतकारांनी आशाताईंकडून वेगवेगळ्या तऱ्हेची गाणी गाऊन घेतली आहेत. सी. रामचंद्र, खय्याम, जयदेव, मदन मोहन, लक्ष्मीकांत - प्यारेलाल, एस. डी. बर्मन, आर.डी. बर्मन, श्रीधर फडके, अनिल- अरुण आणि माझ्याकडे आशाजी गायल्या आहेत.

मदन मोहनच्या ‘झुमका गिरा रे’ मधला नटखटपणा, एस. डी. बर्मनच्या गाण्यातला लाडीकपणा (छोड दो आँचल), ओ. पी. नय्यरची शमशादबेगमसारखी किंवा गीता दत्तसारखी सुरातील नशा कायम राखणारी गीते आशाताई बेफाम गाऊन गेल्या आहेत. एकच आवाज वेगवेगळ्या तऱ्हेने कसा वापरायचा हे आशाताईंना बरोबर माहीत होते. ‘दम मारो दम’ पासून ‘उमराव जान’पर्यंत वापरलेला आवाज म्हणजे विद्यापीठच होते.

मनाची श्रीमंती

आशाताईंबरोबरचा आणखी एक किस्सा मला आठवतोय. त्यांना कलकत्त्याला एक शो आलेला होता. रात्री ८ ते १२ कलकत्त्याचे लोकल आर्टिस्ट आणि १२ ते ४ मुंबईचे कलाकार. त्यात महंमद रफी, हेमंत कुमार, मन्ना डे, कधी आशाजी कधी सुमनताई असायचे. आदल्या रविवारी आशाताईंच्या घरी रिहर्सल ठेवली होती. अरुण पौडवाल हा ऑर्केस्ट्राचे संचलन करीत होता. मी पेटीवर होतो. पण त्या दिवशी रिहर्सलला हार्मोनियमच नव्हती.

ताई म्हणाल्या, ‘‘मी बाळकडे जाऊन आलेच.’’ जाताना हौसेने गेलेल्या आशाताई तणतणतच परत आल्या. दोन दिवसांसाठी पेटी मागितली तर मला नाही म्हणून सांगताहेत. तेवढ्यात त्यांच्या डोक्यात दुसरे नाव आले. म्हणाल्या, ‘‘कमल बारोटला फोन लाव आणि फोन माझ्याकडे दे. मी बोलते तिच्याशी.’’

फोन लागला आणि आशाताई तिला म्हणाल्या, की दो दिनके लिये मुझे बाजा चाहिये. तर कमल बारोट म्हणाली ‘‘कल मेरी रेकॉर्डिंग है । आज म्युझिक डायरेक्टर आ रहा है रिहर्सल के लिये. मै बाजा नही दे सकती।’’ आशाताई जाम भडकल्या होत्या.

अरुणला म्हणाल्या, की आत्ताच्या आत्ता तू आणि अशोक रामसिंगकडे जा आणि नवीन पेटी घेऊन या. मी आणि अरुण दोघेही रामसिंगकडे गेलो आणि नवीन पेटी घेऊन आलो. त्यावेळी स्केल चेंज पेटीची किंमत फक्त ३७२ रुपये होती.

चार- पाच दिवसांनी आम्ही कलकत्त्याला पोहोचलो. दुपारी थोडी रिहर्सल केली. रात्री ११ वाजता शोसाठी निघायचे असे ठरले. सर्व मोठे कलाकार. प्रत्येकाच्या वाट्याला तीन -चारच गाणी येत होती. पहाटे तीन वाजता ग्रँड हॉटेलवर आलो. अरुण म्हणाला.

‘‘आता कुणी झोपायचे नाही. ६ः३० चे परतीचे विमान आहे. आम्ही पत्ते खेळत बसलो. कुणी कॅाफी बनवली. पण बोलता बोलता सगळे कधी झोपले ते कळलेच नाही. कोणीतरी जोरात ओरडले, ‘‘अरे झोपताय कसले ? नऊ वाजले नऊ.’’

खोलीच्या बाहेर आलो तर लिफ्टमधून आशाताई बाहेर येताना दिसल्या. म्हणाल्या,की अरे तुम्ही सर्व इथे कसे? साडेसहाचे फ्लाइट होते ना तुमचं? सारे गप्प होतो आम्ही. क्षमा मागितली. सॅारी म्हणालो. झोप कधी लागली कळलंच नाही. आशाताई म्हणाल्या, ‘‘ठीक आहे. आता बोलून काय उपयोग?’’ आम्ही सर्वांनी विमानाच्या तिकिटाचे पैसे किती म्हणून चौकशी केली. एकेरी मार्गाचे ४०० रुपये तिकीट होते. आम्ही सर्व पैसे अरुणकडे दिले.

आशाताईंना पैसे देण्यासाठी तो त्यांच्या घरी गेला. ते पाहून त्या आणखीनच भडकल्या अन म्हणाल्या, ‘‘स्वतःला श्रीमंत समजता की काय? अरे मलाही कळतं कोणी मुद्दाम करत नाही.’’

संसारातील अनेक अडचणींवर मात करत आशाताई नव्वदीत गाण्यासाठी तयार आहेत. सहा एक महिन्यापूर्वी मला आशाजींचा फोन आला. म्हणाल्या, ‘‘एक गाणे पाठवते तुझ्याकडे. मी बाळकडेच गेले होते तर तो म्हणाला अशोक पत्कींना सांग करायला. म्हणून तुला फोन केला. मला ट्रॅक करून पाठव. रिहर्सल करते आणि मग रेकॅार्डिंग करू. आठ- दहा दिवसांनी रकॅार्डिंग झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com