मुख्यमंत्र्याच्या दारात अस्थिकलश यात्रा - रघुनाथदादा पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्रात मुबलक पाणी आहे. नदीकाठची जमीन आहे, तरीही या भागातील शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "पाणी नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात,' असा केलेला दावा खोटा ठरला आहे. शेतकरी केवळ शेतीमालाला भाव नसल्याने अडचणीत येऊन आत्महत्या करत आहे, हे उघड आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे अस्थिकलश घेऊन मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा जाब विचारणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

रघुनाथदादा म्हणाले, 'मराठवाडा, विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात; पण पश्‍चिम महाराष्ट्रात पाणी असल्याने येथे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत नाही, असे दावे अनेक नेत्यांनी केले होते, पणकोडोली येथील शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे नेत्यांच्या या दाव्याला चपराक बसली आहे. यंदा तुरीचे उत्पादन वाढले आहे. तूर खरेदी करा म्हटल्यावर सरकार म्हणते आमच्याकडे पैसे नाहीत. उधार घ्या म्हटल्यावर सरकार म्हणते आमच्याकडे बारदान नाही. आम्ही बारदानसह तूर देतो, असे म्हटल्यावर सरकार म्हणते आमच्याकडे गोदाम नाही. म्हणजे सरकारला आमचा मालही खरेदी करायचा नाही, अन्‌ भावही द्यायचा नाही, असे दिसते.''

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, यासाठी विरोधी पक्ष संघर्ष यात्रा काढत आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना कर्जमाफीविषयी चौकाचौकांत भाषणबाजी करतात, मात्र सगळे विरोधक एकत्र येऊन विधानसभेत तसा ठराव करीत नाहीत, कारण तेही सत्ताधाऱ्यांशी संधान बांधून आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या पश्‍चिम महाराष्ट्रातही होत आहेत. शेतीमालाला योग्य तो भाव मिळावा, तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने उपाय योजना राबवाव्यात अशा विविध मागण्या घेऊन साखराळे (ता. वाळवा) येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विजय पोवार यांनी मोटारसायकलवरून अस्थिकलश यात्रा सुरू केली आहे. जिथे शेतकरी आत्महत्या करतात तेथे त्या शेतकऱ्यांची रक्षा घेऊन ते मोटारसायकलवरून मुंबईला निघाले आहेत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडणार आहेत. कोडोली येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची रक्षा घेऊन ते कोल्हापुरात आले. येथून सातारा, सोलापूर, पुणेमार्गे मुंबईकडे जाणार आहेत. मात्र अशी रक्षा मिळू नये यासाठी स्थानिक प्रशासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबावरच दबाव टाकला जात असल्याचा आरोप रघुनाथ पाटील व विजय पोवार यांनी केला.

शेट्टींच्या बाता आणि इतरांचा तमाशा
खासदार राजू शेट्टी आत्मक्‍लेश आंदोलन करणार आहेत. तुम्ही काय करणार या प्रश्‍नावर रघुनाथदादा म्हणाले, 'राजू शेट्टी यांच्या तब्येतीकडे बघितले तर ते कसला आत्मक्‍लेश करतात हे दिसून येईल. त्यांना काही करायचे नाही, कारण ते सत्ताधाऱ्यांच्या बाजूचे आहेत. ते सत्ताधाऱ्यांना उलथवून टाकू शकत नाहीत, केवळ बाता मारतात. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशा वल्गना करीत त्यांच्यासारखाच तमाशा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना करत आहे.''

Web Title: Astral Journey at Chief Minister's doorstep