वाळू उपशाला केला विरोध; माफियांनी चढवला अधिकाऱ्यांवरच ट्रॅक्टर

श्‍यामकांत पाटील
गुरुवार, 9 जानेवारी 2020

अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करणाऱ्या महसूल पथकावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने वाहनाला धडक देऊन हल्ला चढविला.

गोवर्धन (ता. अमळनेर) : अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करणाऱ्या महसूल पथकावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने वाहनाला धडक देऊन हल्ला चढविला. ही घटना खर्दे- वासरे रस्त्यावर बुधवारी (ता. 8) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. कर्मचारी बचावले असून, तहसीलदारांच्या वाहनाचे मात्र नुकसान झाले आहे. याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महसूल मंडळ अधिकारी भानुदास शिंदे, तलाठी स्वप्निल कुलकर्णी, तलाठी गौरव शिरसाठ, तलाठी केशव चौधरी, शासकीय वाहनचालक बाळकृष्ण जाधव हे महसूल पथकातील कर्मचारी काल मध्यरात्री दोनच्या सुमारास गस्त घालत होते. त्यांनी खर्दे- वासरे रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने ट्रॅक्टर न थांबवता थेट शासकीय वाहनास धडक दिली. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, शासकीय वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर (एमएच 19 - 807) चालक भालेराव कैलास वानखेडे (रा. चौबारी, ता. अमळनेर) यावर मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालकास अटक करण्यात आली असून, वाळूने भरलेले वाहन मारवड पोलिसांच्या ताब्यात आहे. सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर पाटील, सुनील आगोणे तपास करीत आहेत.

प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी तापी, बोरी व पांझरा काठावरील वाळूच्या ठिकाणांवर जमाव बंदीचे आदेश देऊन अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावला आहे. तहसीलदार मिलिंद वाघ यांनीही विविध भागात पथकाची नेमणूक करून कडक गस्त ठेवली आहे. मात्र, छुप्या पद्धतीने अवैध वाळू वाहतूक सुरू असून, पथकावरील हल्ल्याने हा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

ई-सकाळच्या ट्विटची रेल्वे प्रशासनाकडून दखल

महसूल पथकातील गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने धडक दिली आहे. महसूल कर्मचाऱ्यांवर दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. मात्र, याबाबत मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गस्त अशीच सुरू राहणार असून, कुणाचीही गय केली जाणार नाही.
- मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार, अमळनेर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on tehsil officer by illegal soil dealers in Amalner