अबब! बछड्यांचा आकार ढाण्या वाघाएवढा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

मुंबई - अवनी वाघिणीचे बछडेही तिच्याप्रमाणेच धष्टपुष्ट असल्याने वन विभागाचे धाबे दणाणले आहे. वयोमानानुसार आकाराने मोठे असलेले बछडे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यांनाही दाद देत नाहीयेत. बछड्यांच्या मुद्द्यावरून आगामी हिवाळी अधिवेशनात विरोधकांपासून वनमंत्र्यांना वाचवायचे कसे, असा प्रश्‍न वन विभागासमोर आहे.

बछड्यांचा आहार भरपूर असल्यानेच अवनीच्या हत्येला १४ दिवस उलटूनही त्यांचे आरोग्य व्यवस्थित असल्याचे त्यांच्यासाठी लावलेल्या कॅमेऱ्यातून दिसून येत आहे. वेळ आल्यास ते शिकार करण्यासाठीही हल्ला करू शकतील एवढी ताकद त्यांच्यात निर्माण झाली आहे. बछडे अशक्त असल्यास कॅमेरा ट्रॅपमधून त्यांची तब्येत खालावल्याचे दिसले असते, असे सूत्रांनी सांगितले. स्थानिक वनाधिकारी या पिलांना पकडण्यास धजावत नसल्याची खात्रीलायक माहितीही ‘सकाळ’च्या हाती आली आहे.

अवनीच्या बछड्यांना पकडण्यात पांढरकवडा वनाधिकाऱ्यांना यश आलेले नाही. आईच्या मृत्यूनंतर या बछड्यांचा भूकबळी गेल्यास नव्या वादाला तोंड फुटेल, या भीतीनेच मंत्रालयीन पातळीवरून स्थानिक वनाधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. या बछड्यांसाठी म्हशीच्या मटणाचे तुकडे, बकरीची पिले आणि कोंबडीची पिले वन विभागाने सोडली आहेत. या बछड्यांना पकडताना अवनीसारखी पुनरावृत्ती झाली तर नोकरी जाणार, अशी तंबीच वनाधिकाऱ्यांना मिळाली आहे. आठवडाभरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या वेळी अवनीसंदर्भात विरोधक सरकारला धारेवर धरणार हे निश्‍चित. या काळात बछड्यांचा मृत्यू झाल्यास वनमंत्र्यांना महागात पडेल. त्यामुळेच वनअधिकारी सावध पावले टाकत आहेत.

Web Title: Avani Tiger Calf Size Tiger