जैतापूर प्रकल्पाबाबत जनजागृतीची गरज - फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबई - जैतापूर प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती करावी, तसेच या प्रकल्पात स्थानिकांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी फ्रान्सच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळास सांगितले. जैतापूर प्रकल्पास भाजपबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचा विरोध आहे.

जैतापूर प्रकल्पासंदर्भात फ्रान्सचे परराष्ट्र सचिव ख्रिश्‍चन मॅसे यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची "वर्षा' निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. ऊर्जा विभागाचे सचिव अरविंद सिंह, राजशिष्टाचार विभागाचे सचिव बाजीराव जाधव या वेळी उपस्थित होते. शिष्टमंडळात फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्‍झांडर झायग्लेर, एस. सिओरिटीना, एम. पेन, ई. मिलार्ड, एक्‍स उर्सेल, फिलिप पॉल आदींचा समावेश होता.

जैतापूर प्रकल्पासंदर्भात नागरिकांच्या मनात अनेक प्रश्‍न आहेत. त्यामुळे स्थानिकांशी सुसंवाद साधावा. सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांची माहिती द्यावी. उत्पादित विजेच्या दराबाबतही स्पष्टता असावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जैतापूर प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर करावे, स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी कौशल्य विकासाविषयीचे प्रशिक्षण तातडीने सुरू करावे, असेही त्यांनी सुचवले.

असा असेल प्रकल्प
फ्रान्सचे परराष्ट्र सचिव मॅसे म्हणाले, की जैतापूर प्रकल्पात 10 हजार मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. या प्रकल्पाचे काम 2018 पासून सुरू करणार असून, 2025 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होईल. जपानमधील न्युक्‍लिअर पॉवर प्रकल्पात घडलेल्या घटनेचा अभ्यास करून जैतापूर प्रकल्पात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी विशेष सुरक्षा यंत्रणा असेल. "मेक इन महाराष्ट्र'च्या धर्तीवर हा प्रकल्प राबवण्यात येईल. यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनाचे 60 टक्के काम येथेच होणार आहे. त्यामुळे स्थानिक उद्योगांनाही सहभागी करून घेतले जाईल.

Web Title: Awareness about the need to jaitapur project