बाबासाहेबांनी नाशिककरांना दिला शिवकालीन मौल्यवान ठेवा | Babasaheb Purandare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babasaheb Purandare - Raj Thackeray

बाबासाहेबांनी नाशिककरांना दिला शिवकालीन मौल्यवान ठेवा

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य नव्या पिढीच्या कायमस्वरूपी स्मरणात राहण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर शिवकालीन ठेवा संकलित करण्याचे काम केले. त्या ठेव्यातील काही वस्तू बाबासाहेबांनी नाशिककरांकडे कायमस्वरूपी संग्रहालयात ठेवण्यासाठी दिल्या. बाबासाहेबांच्या निधनानंतर त्या इतिहास संग्रहालयातून कायमस्वरूपी अस्तित्वाची जाणीव राहणार आहे.

इतिहास संग्रहालयातून पुरंदरे यांच्या अस्तित्वाची जाणीव

महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असताना सामाजिक दायित्वाच्या निधीतून राज ठाकरे यांनी अनेक प्रकल्प आणले. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे इतिहास संग्रहालयाचा महत्त्वपूर्ण उल्लेख करता येईल. बाबासाहेब पुरंदरे व राज ठाकरे यांची जुने ऋणानुबंध असल्याने बाबासाहेबांनी संकलित केलेल्या शिवकालीन वस्तूंचे कायमस्वरूपी संग्रहालय असावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्याच अनुषंगाने राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांच्या नावाने इतिहासकालीन शस्त्र संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. बाबासाहेबांच्या इच्छेनुसार संग्रहालयात इतिहासकालीन शस्त्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन भरविण्याचा निर्णय पक्का झाला. त्यानुसार सन २०१६ मध्ये गंगापूर रोडवरील जुने पंपिंग स्टेशन येथे संग्रहालयाचे पुरंदरे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. मुंबईस्थित जीव्हीके कंपनीने दोन वर्षे करारानुसार संग्रहालयाची देखभाल केली. त्यानंतर सेवा ट्रस्टने एक वर्षांसाठी देखभालीचे काम घेतले. मध्यंतरी संग्रहालयातील वस्तू पुणे येथे स्थलांतरित करण्याची चर्चा होती.

हेही वाचा: सेवक छत्रपतींची सेवा करण्यास निघाला; राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

संग्रहालयात ४८० वस्तू

संग्रहालयात शिवकालीन ४८० वस्तूंमध्ये दानपट्टा, वाघ नखे, भाले, तलवारी, दुधारी तलवार, मुख्य लढाईत वापरलेल्या वस्तू, चिलखत, धनुष्यबाण, धनूर आदी वेगवेगळ्या वस्तूंचा समावेश आहे. शिवकालीन वस्तू संग्रहालयात ठेवताना त्या वस्तूंचा इतिहासदेखील बाबासाहेबांनी नाशिककरांना दिला. बाबासाहेबांनी नाशिककरांकडे सुपूर्द केलेला ठेवा त्यांच्या निधनानंतरही कायमस्वरूपी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा राहील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.


''युवापिढीला शिवकालीन इतिहास समजावा या उद्देशाने हाकेला साद देवून बाबासाहेबांनी संग्रहालयासाठी शिवकालीन वस्तू दिल्या. सध्या महापालिकेचे संग्रहालयाकडे दुर्लक्ष झाले असले तरी बाबासाहेबांनी नाशिककरांना दिलेला ठेवा जतन करण्यासाठी मनसेच्या वतीने प्रयत्न करू.'' - सचिन भोसले, समन्वयक, मनसे.

हेही वाचा: बघा अक्षय कुमार काय म्हणतोय...'मी धर्मासाठी जगलोय अन्'...

loading image
go to top