'बाहुबली'ने फेडले डोळ्यांचे पारणे!

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 एप्रिल 2017

सकाळी सहापासून सर्व शो "हाउसफुल', पहिल्याच दिवशी 100 कोटींचा व्यवसाय

सकाळी सहापासून सर्व शो "हाउसफुल', पहिल्याच दिवशी 100 कोटींचा व्यवसाय
मुंबई - 'कटप्पाने बाहुबलीला का मारले?' या गेल्या दोन वर्षांपासून अनुत्तरित असलेल्या प्रश्‍नाच्या उत्तराचा शोध आज अखेर संपुष्टात आला. दिग्दर्शक राजामौली यांच्या "बाहुबली- द कन्क्‍लुजन' या चित्रपटात हे उत्तर शोधण्यासाठी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये रसिकांनी आज प्रचंड गर्दी केली. केवळ दक्षिणेकडीलच नाही, तर देशभरातील अनेक चित्रपटगृहांना अतिरिक्त खेळाचे आयोजन करावे लागले. एकाच वेळी सर्वाधिक पडद्यांवर दाखविला जाण्याचा विक्रम या "बाहुबली'ने आपल्या नावावर केला. कलाकारांच्या अभिनयाबरोबरच चित्रपटात वापरल्या गेलेल्या "व्हीएफएक्‍स' तंत्रज्ञानामुळेही हा चित्रपट आवडल्याचे "फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहणाऱ्या अनेक चित्रपटप्रेमींनी सांगितले.

आज सकाळी सहा वाजल्यापासूनच या चित्रपटाचे शो सुरू झाले आणि बहुतेक ठिकाणचे शो हाउसफुल्ल होते. या चित्रपटासाठी तिकिटांचे दरही वाढले होते. शंभर रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत तिकीट दर होते. काही ठिकाणी या चित्रपटाची तिकिटे काळ्याबाजारात विकली गेली.

सोमवारपासून या चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाले होते. ऑनलाइन बुकिंगवर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या आणि अवघ्या काही तासांतच या चित्रपटाचे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार एक मेचे सगळे शो हाउसफुल्ल झाले. आज पहिल्याच दिवशी चित्रपटाने शंभर कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटातील चित्तथरारक ऍक्‍शन आणि "व्हीएफएक्‍स'चा केलेला उत्तम वापर प्रेक्षकांना भुरळ घालीत आहे.
अतिशय भव्य-दिव्य मांडणीमुळे हॉलिवूडच्या तोडीस तोड चित्रपट झाल्याची भावना व्यक्त होत आहे. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास घडविणार हे निश्‍चित आहे. जवळपास 800 कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय हा चित्रपट करील, असे समीक्षकांचे म्हणणे आहे.
ठाण्यातील इंटरनिटी मॉलमधील सिनेमॅक्‍स या मल्टिप्लेक्‍समधील सागर पाटील म्हणाले, की आमच्याकडे बाहुबली हाच चित्रपट फक्त आजपासून चालू आहे. मागच्या आठवड्यात जेवढे चित्रपट होते ते सगळे काढण्यात आले आहेत. या चित्रपटाचे शो खूप आहेत सगळ्या स्क्रिन्सवर तोच चित्रपट दाखवत असल्याने शो फुल्ल जात नाही. पण खूप गर्दी चित्रपट पाहण्यासाठी झाली आहे. ऑनलाइन तिकीटविक्रीवर सगळ्यांच्याच उड्या पडत आहेत.'

सिनेमा ऑनर्स ऍण्ड एक्‍झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार म्हणाले, की सिंगल स्क्रीनवर बाहुबलीने मोठी धडक मारली आहे. हे असे अनेक वर्षांनतर झाले आहे. लोक रांगा लावून तिकिटे खरेदी करत आहेत, तर ऍडव्हान्स बुकिंगही फुल्ल झाले आहे. नेहमी सिंगल स्क्रिनला चार शो लावले जातात पण या वेळी शोजची संख्याही पाच केली आहे. 70 टक्के सिंगल स्क्रिनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे.
दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या "बाहुबली द बिगिनिंग' हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 650 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. भारतातील एवढी कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला होता. आता त्याचा दुसरा भाग त्यापेक्षाही जास्त कमाई करेल, असे भाकीत वर्तवले जात आहे.

तिकीट चार हजारांच्या घरात
हा चित्रपट आज पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी हाउसफुल्ल होता. मल्टिप्लेक्‍सवाल्यांनी या चित्रपटासाठी तिकीट दर वाढविले होते. काळ्या बाजारात तिकिटाचा दर चार हजार रुपयांपर्यंत गेल्याचे दिसून आले.

विक्रमी प्रतिसाद
- भारतात 6500 व अन्य देशांत 2500 स्क्रीन्सवर प्रदर्शित
- फटाक्‍यांची आतषबाजी व प्रभासच्या प्रतिमेचा दुधाने अभिषेक
- पहिल्याच दिवशी 100 टक्के तिकीटविक्री
- पहाटे सहाच्या पहिल्या शोपासूनच हाउसफुल्लचा बोर्ड
- सुटीच्या दिवसाचे सर्व शो प्रदर्शनापूर्वीच हाउसफुल्ल
- पहिल्याच दिवशी 100 कोटींच्या क्‍लबमध्ये पोचण्याचा अंदाज
Web Title: bahubali 2 movie record