
काही मंडळींसह राजगडवर आम्ही एकत्रित बसून जागा वाटपा विषयी मसुदा तयार केला - बाळा नांदगावकर
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील शिवसेनेत दोन गट पडले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांना स्थगितीचा सपाटा लावल्याने दोन्ही पक्षातील वाद शिगेला पोहचला आहे. दरम्यान, आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर ( Bala Nandgaonkar) यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीतील किस्सा एका मुलाखतीत ऐकवला आहे. यात त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचा कसा केसानं गळा कापण्याचा प्रयत्न केला असल्याचं वक्तव्य केलं आहे.
बाळा नांदगावकर म्हणाले, मला आजही ती तारीख आठवते. 23 सप्टेंबर 2014ला उद्धव ठाकरे यांचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांना फोन आला. ते म्हणाले, आपल्या दोघांना भेटायला पाहिजे. एकत्र बोलायला पाहिजे. त्यानुसार राज ठाकरे यांनी मला बोलावून घेतले. मला घडलेले संभाषण सांगितले. मला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंकडे जायला सांगितले. त्यानुसार मी शिरीष सावंत यांना बोलावले. आणि काही मंडळींसह राजगडवर आम्ही एकत्रित बसून जागा वाटपा विषयी मसुदा तयार केला. मी रात्रभर जागा होतो.
24 सप्टेंबर 2014ला सकाळी बाजीराव दांगट, देशमुख साहेब व राज ठाकरे यांच्यात पुन्हा चर्चा झाली. मी त्या रुमच्या बाहेर बसलो होतो. ते दोघे शिवसेनेकडून निरोप घेऊन आले होते. मी म्हंटलो राज साहेब तुम्ही तुमच्या मोठ्या भावाशी बोलून घ्या. त्यानुसार राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंशी बोलले. त्यानुसार चर्चा झाली. उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून अनिल देसाई बोलतील. राज ठाकरे म्हणाले आमच्याकडून बाळा नांदगावकर बोलतील. दोघांनीही सहमती दर्शविली. 26 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
मी अनिल देसाईंना फोन केला. त्यानुसार त्यांनी उद्धव ठाकरेंशी बोलून सांगतो असे सांगितले. 25 सप्टेंबरला मी देसाईंना फोन केला तर ते म्हणाले बोलतो आणि सांगतो. 25 तारखेला राज ठाकरेंनी मला बोलावून घेतले. आमचे उमेदवारांना देण्यासाठी एबी फॉर्म तयार होते. सर्व एबी फॉर्मवर माझ्या सह्या होत्या. महाराष्ट्रभरातील उमेदवार फॉर्मची वाट पाहत होते. राज ठाकरे म्हणाले काय झाले. मी म्हणालो देसाई म्हणालेत भेटतो बोलतो पण अजून काहीच नाही, असे सांगितले. त्यानुसार राज ठाकरेंनी एबी फॉर्म वाटप करण्यास मला सांगितले. मात्र मी तसे केले नाही. देसाईंच्या निरोपाची वाट पाहिली. एबी फॉर्म थांबविले.
त्यावेळी मी निवडणूक लढवायची अथवा नाही हे स्पष्ट नव्हते. मात्र राज ठाकरेंनी मला निवडणूक लढवायला सांगितले. माझ्या एकट्याच्या एबी फॉर्मवर राज ठाकरेंची सही होती. आम्ही 26 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत फॉर्म भरले. आम्हाला या बाबीचे वाईट वाटले. याचा अर्थ आम्ही भाजप बरोबर जाऊ नये यासाठी खेळलेले ते राजकारण होते. एवढे न कळायला आम्ही काय दूधखुळे होतो. त्यांनी गोड बोलून गळा कापण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही नांदगावकर यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.