
Balasaheb Thorat : थोरातांचा राजीनामा की नुसतं पत्र? सुशीलकुमार शिंदेंच्या विधानाने संभ्रम
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याने मोठा राजकीय भूकंप झाल्याचं मानलं जात आहे. थोरातांचे भाचे सत्यजित तांबे यांना पक्षाने डावलल्यानंतर त्यांचं हे पाऊल पडलं आहे. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिक्रियेने पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. थोरात यांनी थेट दिल्ली हायकमांडकडेच हे पत्र पाठवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हे साधं पत्र आहे की राजीनामा याबद्दल अद्याप माहिती नाही, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही आपल्याला या पत्राबद्दल, राजीनाम्याबद्दल काही माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. आता सुशीलकुमार शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा आहे की फक्त एक पत्र आहे, याबद्दल अजून माहिती नाहीये. त्यांचं कोणाशी बोलणंही झालेलं नाही. मी काल नाना पटोलेंसोबत पुण्यातच होतो. पटोलेंनाही याबद्दल काही माहिती नाही. हे सगळे वाद तात्पुरते असतात, सगळं ठीक होईल."
बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आपल्यापर्यंत आला नसल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. तसंच थोरात आमच्याशी बोलत नाहीयेत, असंही नाना पटोले यांनी सांगितलं आहे.