"डीजें'च्या दणदणाटावर बंदीच 

"डीजें'च्या दणदणाटावर बंदीच 

मुंबई - सण-उत्सवांमध्ये होणारा गोंगाट आणि ध्वनिप्रदूषणाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, असे सुनावत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी डीजे आणि मोठ्या ध्वनिक्षेपकांच्या भिंतींचा वापर करण्यावरील बंदी कायम ठेवली आहे. यामुळे तूर्तास तरी गणेशोत्सवात डीजे आणि मोठे ध्वनिक्षेपक वापरणाऱ्यांविरोधात पोलिस कारवाई करू शकणार आहेत. 

विसर्जन मिरवणुकीत डीजे व इतर ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका प्रोफेशनल ऑडिओ आणि लायटिंग असोसिएशनच्या वतीने न्यायालयात करण्यात आली होती. शुक्रवारी न्या. शंतनू केमकर आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. खंडपीठाने याचिकादारांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला. सण-उत्सवांमध्ये गोंगाट केल्याने होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाकडे आम्ही डोळे मिटून दुर्लक्ष करू शकत नाही. ध्वनिप्रदूषण करणार नाही अशी लेखी हमी दिली जात असली, तरी प्रत्यक्षात त्याचे किती पालन होते हेही सांगायला नको. शिवाय, आपल्याकडे उत्सवही सतत असतातच, असा शेराही खंडपीठाने मारला. 

ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करून डीजे आणि ध्वनिक्षेपकांच्या भिंती वापरायला परवानगी द्या, अशी मागणी याचिकादाराने केली होती. तसेच, पोलिस सर्रास कारवाई करत असून त्यामुळे लाखोंची साधने जप्त होत आहेत, असा आरोप याचिकादारांनी केला होता; मात्र कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. याचिकेवरील पुढील सुनावणी बुधवारी (ता. 19) होणार आहे. 

सरसकट बंदीबाबत प्रश्‍न 
राज्य सरकारने साऊंड सिस्टीमवर टाकलेल्या सरसकट बंदीबाबतही खंडपीठाने प्रश्‍न उपस्थित केले. अशाप्रकारे संपूर्णपणे बंदी घालणे कितपत योग्य आहे. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करून ही बंदी शिथिल करता येईल का, असे सवाल न्यायालयाने सरकारला विचारले आहेत. याबाबत बुधवारपर्यंत खुलासा करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com