संमेलनाचा निषेध हवा; बहिष्कार नको

संमेलनाचा निषेध हवा; बहिष्कार नको

मुंबई - यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाच्या निमंत्रणावरून सुरू असलेला गदारोळ खेदजनक आहे. साहित्यिकांनी या घटनेचा निषेध करावा, परंतु संमेलनावर बहिष्कार टाकू नये, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिकांनी केले आहे.

नयनतारा सहगल यांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी तरी साहित्यप्रेमींनी संमेलनाला जायला हवे. डॉ. अरुणा ढेरे यांच्यासारखी विदूषी संमेलनाध्यक्ष असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतची त्यांची भूमिका सर्वश्रुत आहे. आणीबाणीच्या निषेधार्थ त्यांनी स्वतः तुरुंगवास भोगला होता. त्यामुळे हे साहित्य संमेलन ठरल्याप्रमाणे नेटके व्हायला हवे, असे आम्हाला वाटते, असे या साहित्यिकांनी पत्रकात म्हटले आहे.

हजारो साहित्यप्रेमींचा हिरमोड होऊ नये, संमेलनाध्यक्षांचे प्रगल्भ विचार आणि घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबतची त्यांची भूमिका समजून घेता यावी म्हणून संमेलनावर बहिष्कार घालण्याची भूमिका घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पत्रकावर यांच्या स्वाक्षऱ्या
डॉ. गो. वं. देगलूरकर, डॉ. सदानंद मोरे, द. मा. मिरासदार, मंगला गोडबोले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पांडुरंग बलकवडे, चैतन्य महाराज देगलूरकर, हभप शिवाजी मोरे, शेषराव मोरे, विजय भटकर, दिलीप करंबेळकर, डॉ. बाळ फोंडके, दिलीप माजगावकर, डॉ. विलास खोले, प्रदीप रावत, जयराज साळगावकर, रेखा इनामदार, योगेश सोमण, ग. भा. मेहेंदळे, नामदेव कांबळे, मिलिंद जोशी, ईश्‍वर नंदपुरे, डॉ. स्नेहलता देशमुख, विनोद पवार, कांचन प्रकाश संगीत, आशुतोष अडोनी, प्रशांत आरवे, डॉ. सुबोध नाईक, अरविंद जोशी, अविनाश धर्माधिकारी, राहुल सोलापूरकर, अरुण करमरकर, डॉ. गिरीश दाबके, प्रकाश देशपांडे, सुचित्रा कुलकर्णी, डॉ. एकनाथ खेडकर, डॉ. अर्चना कुडतरकर आदी.

वादाकडे दुर्लक्ष करून संमेलन यशस्वी करा
पुणे : यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणावरून निर्माण झालेल्या वादात न पडण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने घेतला आहे. महामंडळ किंवा आयोजकांच्या भूमिकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून साहित्यप्रेमी वाचकांनी या संमेलनास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही संघाच्या वतीने करण्यात आले आहे. 

सहगल यांच्यासारख्या लेखिकेचा अपमान साहित्य संमेलनाच्या आयोजकांच्या हातून झाला. त्यामुळे त्यांना पुन्हा सन्मानाने निमंत्रित करणे, हाच एकमेव उपाय सध्या आहे. 
-फ. मुं. शिंदे, माजी संमेलनाध्यक्ष

डॉ. सहगल यांना मानाने बोलावणे व नंतर त्यांचे निमंत्रण मागे घेणे हा सर्व कारनामा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी केलेला आहे. हे सर्व करण्यामागे डॉ. जोशी यांचा बोलविता धनी कोण आहे, याचा शोध घ्यावा.
-ॲड. शिवाजीराव मोघे, माजी मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com