नवीन सरकारनेही ते दोन निर्णय बदलले नाहीत- राजू शेट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetti

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर येऊन शंभर दिवस उलटून गेल्यावरही ऊस उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत.

नवीन सरकारनेही ते दोन निर्णय बदलले नाहीत- राजू शेट्टी

बारामती - एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर येऊन शंभर दिवस उलटून गेल्यावरही ऊस उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतले जात नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. सध्या मी कोणत्याही पक्षाशी बांधिल नाही, कोणतेच सरकार ऊस उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेत नाही असा आरोप त्यांनी केला.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, शिंदे व फडणवीस दोघांनाही भेटून त्यांना एफआरपी दोन तुकड्यात देण्याचा निर्णय बदलून एकाच वेळेस एफआरपी द्यावी, भूमी अधिग्रहण कायद्यात महाविकास आघाडी सरकारने बदल करत नुकसानभरपाई चौपट ऐवजी दुप्पट करत बाजारभावापेक्षा वीस टक्क्यांची कपात केल्याने शेतक-यांना या मध्ये 72 टक्के रक्कम पूर्वीपेक्षा कमी मिळत असल्याने या कायद्यात बदल करावा, अशा दोन मागण्या केल्या होत्या. मात्र या दोन्ही प्रश्नांना हात लावण्याचे धाडस दोघांनीही केले नाही.

गेल्या तीस वर्षात सत्तेवर आलेल्या सर्व सरकारांनी ते साखर कारखानदारीला धार्जिणच असल्याचे दाखवून दिले आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला. एकीकडे पूर्वीच्या सरकारचे सगळे निर्णय शिंदे व फडणवीस सरकारने बदलले मात्र शेतकरी हिताचे हे दोन निर्णय काही बदलले नाहीत, अशी नाराजीही त्यांनी बोलून दाखवली.

मी शेतकरी हिताची भूमिका सातत्याने घेतली पण सर्वच सरकारांमधून होणारे निर्णय शेतकरी हिताविरोधात असल्याने सध्या मी कोणत्याही पक्षाशी बांधिल नाही किंवा कोणालाही माझा पाठिंबाही नसल्याचेही शेट्टी यांनी या वेळी स्पष्ट केले.