शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई! पक्षसंघटनासाठी उद्धव ठाकरेंचा नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र दौरा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्यासंबंधीचा कृती कार्यक्रम तयार केला जात आहे. ठाण्यातून हा दौरा सुरु होईल.
balasaheb thakare shivsena
balasaheb thakare shivsenaesakal

सोलापूर : शिवसेनेशी बंडखोरी करून मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्यासंबंधीचा कृती कार्यक्रम तयार केला जात आहे. ठाण्यातून हा दौरा सुरु होईल आणि विशेषत: बंडखोर ४० आमदारांच्या मतदारसंघात त्यांच्या सभा होतील, असे पक्षातील वरिष्ठ नेत्याने सांगितले.

आतापर्यंत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. तीन मातब्बर नेत्यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पुन्हा उभारली. त्यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे होते. पण, त्यांच्या तुलनेत आता एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याचा मोठा फटका शिवसेनेला सोसावा लागला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली. तसेच १९ जून १९६६ रोजी स्थापन झालेल्या शिवसेनेचे पहिल्यांदाच दोन तुकडे झाल्याचे पहायला मिळाले. ठाकरे-शिंदे यांच्यातील संघर्षातून धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना’ व ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना’ असे दोन पक्ष निर्माण झाले. शिंदे गटाने आपल्या पक्षाचा विस्तार वाढविताना आता मागील विधानसभेत उमेदवारी न मिळालेल्यांना व महाविकास आघाडीमुळे कोंडी झालेल्या नगरसेवकांसह आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांना आपलेसे करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नोव्हेंबर महिन्यांत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतील, असा विश्वास देखील वरिष्ठ नेत्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

झेडपी, महापालिकांमध्ये यश मिळालले तरच...

राज्यातील २५ जिल्हा परिषदा, २३ महापालिका, २२० नगरपालिका, नगरपंचायती आणि २८४ पंचायत समित्यांची मुदत संपली आहे. त्यावर आता प्रशासक आहेत. मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या या निवडणुकांच्या निकालावर शिंदे व ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व अवलंबून असेल. नेमकी खरी शिवसेना कोणाची अन्‌ जनाधार कोणाकडे आहे हे स्पष्ट होईल. त्यात महाविकास आघाडी होईल की नाही हे अस्पष्ट आहे. परंतु, केंद्रात व राज्यात सत्तेत असलेला भाजप शिंदे गटाला सोबत घेऊन या निवडणुका लढेल, हे निश्चित आहे. त्यामुळे अधिकाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांवर विजय मिळविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

पक्षप्रमुख निश्चित करतील महाराष्ट्र दौरा

अतिवृष्टीत बाधितांना मदत मिळावी म्हणून पक्षप्रमुखांनी औरंगाबाद दौरा केला. आता नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून ते महाराष्ट्र दौरा करतील. त्याची सुरवात ठाण्यातून होईल.

- अनिल कोकीळ, सोलापूर संपर्कप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com