मनमानीविरोधात लढण्याची तयारी ठेवा - उद्धव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

मुंबई : नोटाबंदीमुळे मुंबईतील व एकंदरच सत्तर टक्के व्यापार थंडावल्याची तक्रार व्यापारीवर्गाने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यामुळे या मनमानीविरोधात संघटितपणे लढण्याची तयारी ठेवा, असा सल्ला ठाकरे यांनी त्यांना दिला.

मुंबई : नोटाबंदीमुळे मुंबईतील व एकंदरच सत्तर टक्के व्यापार थंडावल्याची तक्रार व्यापारीवर्गाने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यामुळे या मनमानीविरोधात संघटितपणे लढण्याची तयारी ठेवा, असा सल्ला ठाकरे यांनी त्यांना दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाचा फटका देशभरातील व्यापाऱ्यांना बसल्याची तक्रार व्यापारी शिष्टमंडळाने ठाकरे यांच्यासमोर मांडली. रिटेल व्यापाऱ्यांची संघटना फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिशनच्या प्रतिनिधींनी त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्या वेळी ठाकरे बोलत होते. हा निर्णय घेताना मोदींनी जनतेला विश्वासात घ्यायला हवे होते. मुंबईसह महाराष्ट्रातीलच नव्हे देशभरातील सर्व व्यापारी एकत्र या व लढा द्या, मीदेखील तुमच्याबरोबर आहे, असेही ते म्हणाले.
सर्वसामान्यांसाठी जन-धन योजना आणण्यात आली. काळा पैसा बाहेर काढून लाखो रुपये या खात्यात जमा करू, असे आश्वासन मोदी यांनी दिले होते. आता जिल्हा बॅंकांवर बंदी आणली, त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. जी जन-धन खाती आहेत त्यावरही सरकारची नजर आहे, मग ही योजना आणलीच कशाला, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

नरेंद्र मोदींना सत्तेवर आणण्यासाठी याच व्यापाऱ्यांनी मदत केली होती. आता त्यांनाच त्रास दिला जातोय, अशी प्रतिक्रिया व्यापारी संघटनेचे वीरेन लिंबाचिया यांनी व्यक्त केली. ऐन हंगामात नोटाबंदीच्या निर्णयाने व्यवसाय ठप्प झालाय. टॅक्‍स, व्हॅट, सर्व्हिस टॅक्‍सचे ओझे असतानाच आता नोटाबंदीमुळे व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. तेव्हा सरकारने व्हॅट आणि इन्कम टॅक्‍स रद्द करावा ही आमची मागणी असल्याचे वीरेन शहा यांनी सांगितले. शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर व उपनेते राजकुमार बाफना यांच्या उपस्थितीत मुंबई, ठाणे, वसई येथील हॉटेल व्यावसायिक, किरणा व्यापारी, तसेच वाहतूक व्यापाऱ्यांबरोबर उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली.

Web Title: be ready to fight - uddhav thackeray