"भारतीय' हीच खरी असावी ओळख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

पुणे - ""महाराष्ट्र राज्यात अनेक राज्यांचे लोक महाराष्ट्राला आपलं समजून राहतात. इथल्या विकासात योगदान देतात. त्यांचा दृष्टिकोन हा एखाद्या राज्यापुरताच संकुचित नसून "भारतीय' असाच असतो. हेच महाराष्ट्राचे खरे महत्त्व आहे,'' अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी खऱ्या भारतीयत्वाची ओळख पटवून दिली.

पुणे - ""महाराष्ट्र राज्यात अनेक राज्यांचे लोक महाराष्ट्राला आपलं समजून राहतात. इथल्या विकासात योगदान देतात. त्यांचा दृष्टिकोन हा एखाद्या राज्यापुरताच संकुचित नसून "भारतीय' असाच असतो. हेच महाराष्ट्राचे खरे महत्त्व आहे,'' अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी खऱ्या भारतीयत्वाची ओळख पटवून दिली.

पहिल्या विश्‍व पंजाबी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी पवार शुक्रवारी बोलत होते. यानिमित्ताने पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. पवार म्हणाले, ""जगात ज्यांना बंधुता हे तत्त्व प्रिय आहे, ते सारेच गुरुनानक यांच्या विचारांना पुढे नेत आहेत... मग भले ते पंजाबी असतील किंवा अजून कोणत्याही जाती-धर्माचे. आज मराठी-पंजाबी नात्याचे नवे पर्व रुजत आहे.''

शेतीसाठी योगदान देण्यात पंजाब राज्य देशात अग्रेसर आहे, तर महाराष्ट्र त्याच्या पाठोपाठ. या दोन्ही प्रदेशांत अनेक बाबतीत साम्य आहे. पंजाबी भाषा ही एक संपन्न भाषा आहे. ती आज पंजाबच्या सीमा ओलांडून देशभरात जाऊन पोचली आहे. पंजाबी भाषेतलं साहित्य शेकडो वर्षं जुनं आहे. आज शीख समाजातील अनेक लेखक इंग्रजीतसुद्धा उत्तम लिहिताना पाहायला मिळतात. "लाल-पाल-बाल' यांचा विचार बाजूला सारता येणे केवळ अशक्‍यच आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, ""शालेय जीवनात मी गुरू गोविंदसिंग यांच्या जीवनावर असलेल्या एका नाटकात काम केले होते. या वेळी त्यांचे चरित्र वाचल्यानंतर मन अतिशय प्रभावित झाल्याची आठवण मला आजही आहे. आज या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र-पंजाब या दोन भूमींमधील नाते नवसंजीवनी मिळत पुनरुज्जीवित झाले आहे, असे मी मानतो. समाजातील अंधार दूर करत नवे विचार आणण्याचे काम साहित्यातून व्हायला हवे.''

साहित्याला भाषेचे बंधन नाही
""शौर्यासोबत विवेक, हिमतीसोबत न्याय आणि साहसासोबत ममत्व हे गुरू गोविंदसिंग यांच्या विचारांचं महत्त्व आहे. त्यांच्या विचारांत एकात्मतेची बीजं रोवलेली आहेत. अभिव्यक्त होण्यासाठी भाषा हे माध्यम असते; पण साहित्याला भाषेचे बंधन नसते,'' असे फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: This is to be the true identity of "Indian"