
राज ठाकरेंना दुसरा झटका! बीड कोर्टाचं अजामीनपात्र वॉरंट जारी
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात परळी कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. सांगली, शिराळा नंतर आता बीड जिल्ह्यातही अजामीनपात्र वॉरंट समोर आलं आहे. मराठी पाट्यांसंदर्भात झालेल्या आंदोलनाप्रकरणी हे वॉरंट जारी झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार का अशी चर्चा सुरु आहे.
हेही वाचा: ठरलं! संभाजीराजे 12 मे ला पुढील राजकीय भूमिका करणार स्पष्ट
परळी कोर्टाचं अजामीनपात्र वॉरंट या प्रकरणात आता गृहखाते अॅक्शन मोडमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात गृहखाते कारवाई करेल अशी माहिती मिळत आहे. २००८ साली मराठी पाट्या आणि मराठी भाषेवरून मनसेच्या वतीने परळी येथे आंदोलन करण्यात आलं होतं. परळी येथे त्यावेळी जबरदस्ती दुकानं बंद करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला होता. याप्रकरणी एक गुन्हा दाखल झाला होता. दोन दिवसांपूर्वी नुकताचं सांगलीतील शिराळा येथे राज ठाकरेंविरोधात एक आजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. त्यानंतर आता पाठोपाठ परळी येथेही असं वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना आणखी एक झटका बसला आहे. याविषयी एक पत्र मुबंई पोलिसांना प्राप्त झालं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मुंबई पोलिसही अॅक्शन मोडमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता यासंदर्भात कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याने राज्य सरकार आणि मनसे यांच्यातील संघर्ष टोकाला गेला असल्याचे चित्र आहे. आता या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हा वाद पेटणार का अशी चर्चा सुरु आहे. सांगलीतील शिराळा कोर्टाकडून राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं. एका जुन्या प्रकरणात हे वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती आहे. ६ एप्रिल रोजी हे वॉरंट जारी करूनही अद्याप राज यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही कोर्टाने पोलिसांना विचारल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा: कोल्हापुरात लोकराजा शाहू राजांना १०० सेकंद स्तब्ध राहून अभिवादन!
नेमकं काय आहे सांगली वॉरंट प्रकरण?
कल्याण येथे २००८ साली परप्रांतीयांच्या मुद्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर कल्याण पोलिसांकडून अटकेची कारवाई झाली होती. या कारवाईचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. सांगली जिल्ह्यातही राज यांच्या अटकेविरोधात मनसेकडून आंदोलन करण्यात आलं होतं. शिराळा तालुक्यातल्या शेंडगेवाडी इथं मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनातही तोडफोडीचा प्रकार घडला होता.
या प्रकरणी शिराळा पोलिस ठाण्यात तानाजी सावंत यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला होता. तसंच या गुन्ह्याप्रकरणी २००९ साली राज ठाकरे यांनी शिराळा न्यायालयामध्ये हजर राहून जामीनही घेतला होता. मात्र त्यानंतर सदर खटल्याच्या सुनावणी तारखांना वारंवार गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे.
Web Title: Beed Court Issues Non Bailable Warrant Against Raj Thackeray In Parli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..