Jaydutt Kshirsagar: 'ते' कधीच शिवसेनेत रमले नाहीत; फक्त तिकीट मिळवण्यासाठी क्षीरसागरांनी...

Beed Jaydatta Kshirsagar
Beed Jaydatta Kshirsagaresakal

बीडः माजी मंत्री तथा ठाकरे गटाचे नेते जयदत्त क्षीरसागर यांची काल 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. बीड जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख धोंडू पाटील आणि जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी तशी अधिकृत घोषणा केली. ठाकरे गटाच्या या निर्णयामुळे क्षीरसागरांना खरंच फरक पडणार आहे का? की त्यांच्यासाठी ही इष्टापत्ती ठरेल, पाहूया.

Jaidatt kshirsagar

२०१६पासून बीडमध्ये काका-पुतण्यामधील बेबनाव दिसून येत आहे. तेव्हा झालेल्या नगर पालिका निवडणुकीत पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीशी दुरावा करीत काकू-नाना विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या दिल्या. या निवडणुकीत आपले १९-२० उमेदवार निवडूनही आणले. त्यानंतर अनेकजण संदीप यांना सोडून क्षीरसागरांच्या गटात सामील झाले.

jaydatta kshirsagar

Sandip kshirsagar

पवारांच्या जवळचे म्हणून ओळख...

शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे असलेले जयदत्त क्षीरसागर हे पुढे-पुढे पक्षापासून दूर होत गेले. कारण पक्षाकडून संदीप क्षीरसागर यांना बळ मिळे. संदीप क्षीरसागर हे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळ गेले होते. त्यामुळे त्यांना रसद मिळत गेली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिलं. त्यामुळे नाईलाजाने जयदत्त क्षीरसागरांना शिवसेनेत प्रवेश करावा लागला. २०१९ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढले. बीड विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला सुटल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे 'शिवसेना' हाच एकमेव पर्याय होता.

Jaidatta Kshirsagar

sandeep kshirsagar

पुतण्याने केला पराभव

२०१९च्या या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी त्यांचा पराभव केला. या लढतीमध्ये संदीप यांना 99 हजार 934 तर जयदत्त क्षीरसागर यांना 97 हजार 950 मते मिळाली. साधारण दोन हजार मतांनी जयदत्त क्षीरसागर पराभूत झाले. जयदत्त क्षीरसागर यांचं घर फुटलं असलं तरी त्यांचे दुसरे लहान बंधू आणि जे मागील ३० वर्षांपासून बीड नगर पालिकेत नगराध्यक्ष आहेत; ते भारतभूषण क्षीरसागर त्यांच्यासोबत होते. तुलनेने संदीप क्षीरसागरांनी एकाकी झुंज दिली.

शिवसेनेने मंत्रिपद दिलं, पण...

काल (दि.२२ ऑक्टोबर) क्षीरसागरांनी ठाकरे गटातून हकालपट्टी केली असली तरी क्षीरसागरांना तेच हवं होतं का? असा प्रश्न पडतोय. कारण राजकीय परिस्थिती तशीच आहे. शिवसेनेने २०१९ पूर्वी शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात काही महिन्यांसाठी जयदत्त यांना मंत्रिपद दिलं होतं. पुढे निवडणुकीत तिकीटही दिलं. तरीही क्षीरसागर शिवसेनेशी फार मिळून मिसळून राहिल्याचं दिसलं नाही. परवा बीडमधल्या ७० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटनावेळी जयदत्त क्षीरसागर मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. शिवसेनेला हेच खटकलं. याबरोबच क्षीरसागरांनी मागील तीन वर्षांमध्ये पक्षसंघटनेसाठी फार काही केलं नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे शिवसैनिक त्यांच्यावर नाराज होते.

२०२०मध्ये झालेल्या सत्तास्थापनेत शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी जवळीक करुन सत्तास्थापन केली. त्यामुळे शिवसेना-भाजप युती उरली नाही. तेव्हापासून क्षीरसागर नेमके कोणत्या पक्षात, असा प्रश्न बीडकरांना कायम पडे. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा मागील सहा महिन्यांपासून सुरु आहेत. प्रत्यक्षात त्यांनी काही निर्णय घेतला नव्हता. अखेर त्यांना ठाकरे गटाने दूर केलेच.

Beed Jaydatta Kshirsagar
Land Scam: देवस्थानची शेकडो एकर जमीन लाटली; भाजपचा बडा नेता अडकण्याची शक्यता

देवेंद्र फडणवीसांशी आधीपासूनच जवळीकता

जयदत्त क्षीरसागर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळीकता आहे. २०१९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने क्षीरसागरांना दूर लोटल्यानंतर क्षीरसागरांना लढण्यास पक्ष नव्हता. काँग्रेस, भाजप की शिवसेना; या द्वंदात क्षीरसागरांनी शिवसेनेला प्राधान्य दिलं. कारण बीड विधानसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेसाठी सुटला होता आणि आघाडीत राष्ट्रवादीला. राजकीय जाणकार असं सांगतात की, क्षीरसागरांनी शिवसेनेकडून हा मतदारसंघ लढवावा, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्यानेच त्यांनी शिवसेनेचं शिवबंधन बांधलं. परंतु राजकारणात तीस-चाळीस वर्षे जोपासलेली एक विचारसरणी सोडून दुसऱ्या टोकाच्या विचारसरणीशी जुळवून घेणं, तसं जड होतं. म्हणूनच मागील तीन वर्षांत जुन्या शिवसैनिकांशी त्यांचे सूर जुळले नाहीत.

२०२४मध्ये पुन्हा काका-पुतण्या समोरासमोर?

पूर्वीपासून बीड विधानसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेसाठी असायचा. त्यामुळे भाजपचं नेतृत्व इथे फुलू शकलं नाही. आता मात्र जयदत्त क्षीरसागरांच्या रुपाने एक मोठा नेता भाजपकडे आहे. क्षीरसागर लवकरच अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. २०२४मध्ये पुन्हा एकदा राज्याला काका-पुतण्याची लढाई पहायला मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com