खर्च पाचशेचा, कर्जमाफी सव्वातीनशे रुपयांची!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

बीड - दिवाळीला कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खाती पडेल, ही सरकारची घोषणा खोटी ठरली आणि रकमा यायला नोव्हेंबर उजडावा लागला. त्यातच एका शेतकऱ्याला केवळ 336 रुपये अनुदान रक्कम वर्ग केल्याचा प्रकार मराठवाड्यात घडला. विशेष म्हणजे या शेतकऱ्याला ऑनलाइन अर्ज, चकरा आणि कागदपत्रे जमा करण्यासाठी पाचशेचा खर्च आणि पाच दिवस वाया घालावे लागले. त्यामुळे "हीच का सरकारची छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना?' असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

दिवाळीच्या पहिल्या अंघोळीला शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे पडतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्र्यांनी केली. वास्तवात कर्जमाफीच्या याद्या आणि रकमा येण्यास 31 ऑक्‍टोबर उजडावा लागला. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या 236 कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या यादीत एका शेतकऱ्याच्या खात्यावर केवळ 336 रुपये आले आहेत! माफीचा असा कुठला निकष सरकारने लावला की शेतकऱ्यांची हेटाळणी केली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्हा बॅंकेच्या 236 कर्जमाफी आणि नियमित प्रोत्साहन अनुदानास पात्र (नियमित कर्ज भरणाऱ्यांना अनुदान) शेतकऱ्यांची यादी आणि त्यांच्यासाठी 90 लाख 24 हजार 828 रुपयांचा निधी आज शासनाकडून प्राप्त झाला आहे. मात्र, या यादीतील नरहरी यशवंत गायके (रा. पुस, ता. अंबाजोगाई) या शेतकऱ्याला 336 रुपयांची रक्कम आली आहे. हा प्रकार शेतकऱ्यांची हेटाळणी असल्याचेच दिसते. दरम्यान, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या सव्वापाच हजार पात्र शेतकऱ्यांसाठी 34 कोटी रुपये मिळाले आहेत.

अर्ज भरण्यासाठी पाच दिवस खस्ता
पुस (ता. अंबाजोगाई) येथील अडीच एकर जमीन असलेल्या नरहरी यशवंत गायके यांच्याकडे सेवा सोसायटीचे कर्ज आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या घाटनांदूर शाखेअंतर्गत असणाऱ्या पुस सेवा सहकारी संस्थेकडून त्यांनी गेल्या वर्षी 19 हजार 800 रुपयांची फेड केल्यानंतर यंदा 21 हजार रुपयांचे कर्ज घेतले. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्जासाठी त्यांना पाच दिवस खस्ता खाव्या लागल्या. सर्व्हर बंद, वीजपुरवठा नाही, कागदपत्रांची जुळवणी, पत्नीला घेऊन जात अंगठ्याचे ठसे अशा सर्व कारणांनी त्यांचे पाच दिवस आणि पाचशे रुपयांचा खर्च झाला. मात्र, त्यांना माफीचे केवळ 336 रुपये आले आहेत.

Web Title: beed marathwada news farmer loanwaiver issue