esakal | "बेळगाव महानगरपालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकेल"
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत

"बेळगाव महानगरपालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकेल"

sakal_logo
By
नामदेव कुंभार

बेळगाव महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षानंतर मतदान होत आहे. त्यानिमित्ताने बेळगाव महानगरपालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकेल, आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर पुन्हा मराठी माणसाचीच सत्ता आहे हे सिद्ध होईल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्याचं लक्ष लागलेल्या बेळगाव महानगरपालिकेसाठी आज मतदान सुरु झालं आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. बेळगाव शहरातील ४१५ मतदानकेंद्रांवर मतदान होईल. महापालिका निवडणूकीच्या रिंगणात तब्बल ३८५ उमेदवार आहेत. शहरातील ४ लाख ३० हजार ८२५ मतदार या निवडणूकीत ५८ नगरसेवक निवडून महापालिकेवर पाठवणार आहेत. यात पुरूष मतदारांची संख्या २ लाख १४ हजार ८४८ इतकी आहे तर महिला मतदारांची संख्या २ लाख १५ हजार ९७७ इतकी आहे.

बेळगाव महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षांनंतर मतदान होत आहे. मीही प्रचाराला जाणार होतो, पण आम्ही प्रचाराला गेल्याने एकीकरण समितीवर परत कर्नाटक सरकारचा दहशदवाद नको. त्यामुळे आम्ही त्यांना इथूनच मदत करायचं ठरवलं आहे. कर्नाटक सरकारने मराठी सत्ता असलेली महानगरपालिका द्वेषबुद्धीने बरखास्त केली आणि भगवा उतरवला, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

हेही वाचा: गणेशोत्सवामध्ये पुण्यात नवे निर्बंध नाहीत, पण... - अजित पवार

बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण आणि इतर आमचे मराठी संघटना मिळून 30 च्या आसपास जागा जिंकू आणि पुन्हा एकदा बेळगाव महानगरपालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकेल. मराठा म्हणून एकजुटीने मतदान करा हे शिवसेनेच्या वतीने मी बेळगावच्या जनतेला आवाहन करतो. दाखवण्यासाठी लोकशाही मार्गाने आणखीन एक संधी या ठिकाणी मिळून आली आहे, असे राऊत म्हणाले.

हेही वाचा: आमचे कार्यकर्ते थुंकले तरी सरकार वाहून जाईल- भाजप नेत्या

बेळगाव महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी ३३ नगरसेवक निवडून येणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती व भाजपने ४० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा दावा केला आहे. अपवाद वगळता आजवर बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजेच मराठी भाषिकांची सत्ता राहिली आहे. यावेळी बेळगावचे मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार हे पहावे लागणार आहे. ६ सप्टेबर रोजी मतमोजणी होणार आहे.

loading image
go to top