अथणी तालुक्यातील अपघातातील मृतांची संख्या आता पाच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

बेळगाव - अथणी तालुक्यातील खोतनट्टी गावाजवळ गुरूवारी झालेल्या अपघातातील मृतांची संख्या आता पाच झाली आहे.

बेळगाव - अथणी तालुक्यातील खोतनट्टी गावाजवळ गुरूवारी झालेल्या अपघातातील मृतांची संख्या आता पाच झाली आहे.

या अपघातात गंभीर जखमी झालेले संपत जगताप (वय-70) यांचा गुरूवारी रात्री मिरज येथील सिव्हील हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. संपत जगताप हे पालक होते, आपल्या पाल्यासोबत ते स्कूलबसमधून प्रवास करत होते.

घटनेची चौकशी करणार
घटनेबाबत माणिकप्रभू संस्थेचे अध्यक्ष सी. एच. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जखमी विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च संस्था उचलणार असल्याचे सांगितले. तर स्कूलबसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी भरल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर गटशिक्षणाधिकारी एम. वाय. व्हनकस्तुरी म्हणाले, संस्था खाजगी विनाअनुदानित शाळा असल्याने नियमानुसार चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

दुचाकीला उडविल्यानंतर स्कूलबस उलटून खोतनट्टी गावाजवळ हा अपघात झाला होता. यात बसचालकासह दुचाकीवरील तिघे ठार झाले होते तर बसमधील ३० विद्यार्थी जखमी झाले. संकेश्‍वर-जेवरगी राज्यमार्गावर खोतनट्टीजवळ (ता. अथणी)  गुरुवारी (ता. १८) सकाळी १० च्या सुमारास हा अपघात झाला होता. 

दानाप्पा मगदूम (वय ३८), मनोज दोडमनी (३२), आप्पासाहेब संभू मराठे (वय ४०, तिघेही रा. यलहडलगी, ता. अथणी) व बसचालक सिद्धगिरी सिद्धाप्पा पुजारी (वय ३०, रा. आरटाळ, ता. अथणी) अशी मृतांची नावे आहेत. सागर ठक्कनावर, आकाश ठक्कनावर, विकास माने, निहाल माने, प्रभू हालेली हे गंभीर जखमी आहेत.  त्यांच्यावर मिरजेतील शासकीय व खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. अन्य २५ विद्यार्थी किरकोळ जखमी असून त्यांच्यावर अथणी शासकीय दवाखान्यात उपचार सुरु आहेत. 
 

Web Title: Belgaum News Accident in Athani Taluka