जबाबदार डॉक्‍टर ते अस्वस्थ ‘अपरिचित’

संजय सूर्यवंशी
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

एक जबाबदार डॉक्‍टर शहरातील मोटारी जाळत फिरू लागला... पोलिस अधिकारी अन्‌ बिम्स्‌ व्यवस्थापनाचेही म्हणणे आहे की, त्याचे मानसिक संतुलन ढळले आहे... त्याच्यातील एक प्रकारची विकृती बाहेर येऊन तो अचानक ‘अपरिचित’ बनला अन्‌ एका दिवसात दहा मोटारी जाळून वाहनधारकांचे कोट्यवधीचे नुकसान केले.

बेळगाव - डॉ. अमित विजयकुमार गायकवाड, वय वर्षे ३७... शिक्षण एमबीबीएस एमडी पॅथॉलॉजी... दहा वर्षांपूर्वी बिम्स्‌मध्ये रुजू झाला... व्यवस्थापनाने दिलेली प्रत्येक जबाबदारी व्यवस्थित पार पाडली... कामासाठी कोणाकडूनही बोलून घेतले नाही... पण गेल्या महिनाभरापासून त्याचे मानसिक स्वास्थ्य ढासळले... तो रक्तपेढीतील टेक्‍निशियनना शिवीगाळ करू लागला... त्याची तक्रार थेट पोलिस ठाण्यात गेली अन्‌ काय झाले कोणास ठाऊक... एक जबाबदार डॉक्‍टर शहरातील मोटारी जाळत फिरू लागला... पोलिस अधिकारी अन्‌ बिम्स्‌ व्यवस्थापनाचेही म्हणणे आहे की, त्याचे मानसिक संतुलन ढळले आहे... त्याच्यातील एक प्रकारची विकृती बाहेर येऊन तो अचानक ‘अपरिचित’ बनला अन्‌ एका दिवसात दहा मोटारी जाळून वाहनधारकांचे कोट्यवधीचे नुकसान केले.

अमित गायकवाड हा तरुण डॉक्‍टर १० जुलै २००७ मध्ये बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेजमध्ये (बिम्स्‌) रुजू झाला. विद्यमान संचालक डॉ. एस. टी. कळसद यांच्या म्हणण्यानुसार कर्तव्यदक्ष, कामात तत्पर अशीच डॉ. अमितची ओळख आहे. बिम्स्‌मध्ये वरिष्ठ डॉक्‍टरांची बैठक असो वा जिल्हाधिकारी कार्यालयातील एखादी बैठक असो, अधिकाऱ्याशी संवाद साधायचा असेल तर डॉ. अमित स्वतः अगदी आत्मविश्‍वासपूर्ण माहिती देत असे. गेल्या दहा वर्षांत त्याच्या कामाबाबत कोणतीही तक्रार नव्हती. जुनी रक्तपेढी असताना त्याने चांगले काम केले. म्हणून बिम्स्‌ची स्वतंत्र अत्याधुनिक रक्तपेढी तयार झाल्यानंतर प्रमुख म्हणून डॉ. अमितची नियुक्ती केली गेली. गेल्या चार वर्षांपासून तेथील कामही अगदी जबाबदारीने त्याने 
पार पाडले.

महिन्यापासून अस्वस्थ 
गेल्या महिन्यात बिम्स्‌च्या रक्तपेढीतून पाच टेक्‍निशियननी डॉ. अमितविरोधात तक्रार केली. आधी ही तक्रार संचालक डॉ. कळसद यांच्याकडे तर नंतर थेट एपीएमसी पोलिस ठाण्यात केली. डॉ. अमितच्या वागणुकीत बदल झालेला आहे, ते विनाकारण शिवीगाळ करतात, उगीचच भांडण काढतात, अद्वातद्वा बोलून वारंवार अपमान करतात, आम्ही येथे काम करणार नाही, अशी त्यांची तक्रार होती. त्यानंतर हे पाचजण काम करत नसल्याची तक्रारही येथील तिघी तरुणींनी केली होती. दोन्ही बाजूंनी तक्रार आल्यानंतर बिम्स्‌ व्यवस्थापनाने शहानिशा केल्यानंतर डॉ. अमितची मानसिकता ढासळल्याचे स्पष्ट झाले.

महिनाभर सक्तीच्या रजेवर 
गेल्या आठवड्यात तक्रार आल्यानंतर डॉ. कळसद यांनी डॉ. अमितला १६ जानेवारीला बोलावून घेतले व विभागप्रमुख डॉक्‍टरांनी केलेल्या शिफारशीनुसार डॉ. अमितला एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविले. याच दिवशी सायंकाळी पुन्हा बिम्स्‌मध्ये येऊन डॉ. अमितने गोंधळ घातल्याचेही स्पष्ट झाले. त्यानंतर त्याने १७ रोजी पहाटे ७ तर याच दिवशी रात्री तीन अशा दहा अालिशान मोटारी पेटविल्याचे स्पष्ट झाले. सध्या डॉ. अमित पोलिसांच्या ताब्यात आहे. परंतु तो पोलिसांच्या कोणत्याही तपासाला प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येते. 

अमितमधील नकारात्मक ‘अपरिचित’ 
तमिळ सुपरस्टार विक्रमचा टीव्हीवर नेहमी ‘अपरिचित’ नावाचा चित्रपट लागतो. एका सर्वसाधारण वकिलाला अन्याय सहन होत नाही व तो अस्वस्थ होतो. त्यातून त्याच्यात लपलेला एक अपरिचित डॅशिंग हिरो बाहेर येऊन तो अन्यायाचा बदला घेतो, अशा आशयावर हा चित्रपट बेतला होता. परंतु नेमके याच्या उलटे समाजात अशांतता निर्माण करणारा ‘अपरिचित’ डॉ. अमितमध्ये जागा होतो. कोणतेही ठोस कारण नसताना घरासमोर लावलेल्या मोटारी पाहायच्या, पहाटे वा रात्रीच्या वेळी मोटारीजवळ जाऊन बॉनेट व वायपरमधील मोकळ्या जागेत कापडाचा बोळा, कापूर, त्यावर थोडेसे पेट्रोल, रॉकेल अथवा स्पिरीट ओतायचे अन्‌ मोटारीला आग लावायची, असा प्रकार डॉ. अमित करत असल्याचे दिसून आले.

Web Title: Belgaum News burning of cars incidence by doctor