सीमावासीयांकडून प्रतिकूल स्थितीत ‘मराठी’ची जपणूक - मिलिंद जोशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

मराठीच्या लेकरांना त्यांच्या मातृभाषेपासून तोडण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले आहे. त्यांना न्यायव्यवस्था नक्‍कीच धडा शिकवेल. सध्या सीमाप्रश्‍न अंतिम टप्प्यात असल्यामुळे लवकरच न्याय मिळेल,’ असा विश्‍वास पुण्यातील प्रा. डॉ. मिलिंद जोशी यांनी व्यक्‍त केला.

बेळगाव - ‘कर्नाटकच्या अत्याचाराखाली दडपूनही सीमाभागातील मराठी बांधव प्रतिकूल परिस्थितीत मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती जपत आहेत. मराठीच्या लेकरांना त्यांच्या मातृभाषेपासून तोडण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले आहे. त्यांना न्यायव्यवस्था नक्‍कीच धडा शिकवेल. सध्या सीमाप्रश्‍न अंतिम टप्प्यात असल्यामुळे लवकरच न्याय मिळेल,’ असा विश्‍वास पुण्यातील प्रा. डॉ. मिलिंद जोशी यांनी व्यक्‍त केला. कुद्रेमानीतील बलभीम साहित्य संघातर्फे रविवारी (ता. ७) आयोजित तपपूर्ती मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून ते  बोलत होते. 

डॉ. जोशी म्हणाले, ‘‘कर्तृत्वाला उभारणी देणारे गाव म्हणून कुद्रेमानीकडे पाहावे लागेल. सीमाभागातील साहित्य संमेलने ही मराठी भाषकांच्या भावना मांडणारी संमेलने आहेत. मनाची व बुद्धीची भूक साहित्यातून मिटते. बोलणं हे साहित्याचं पहिलं रूप आहे. संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी अगोदर सांगितली व त्यानंतर ती लिहिली गेली. बोलणं हे काळजावर कोरल्याप्रमाणे असून, ते कधीही पुसता येत नाही. साहित्यात मोठी ताकद आहे. नरेंद्रचा विवेकानंद होण्यामागे एका कवितेचा वाटा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील राज्यकर्त्यांना पुस्तकांनी घडविले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, वीर सावरकर चांगले साहित्यिक होते. मात्र, आताचे राज्यकर्ते साहित्य वाचत नाहीत.’’

‘‘जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतर जगण्याचा तीव्र झालेला संघर्ष साहित्यातून तेवढ्याच प्रभावीपणे प्रकट होत आहे. ‘समीक्षेच्या जुन्या फुटपट्ट्यांनी नव्या साहित्याचे मोजमाप करू नका,’ असा या लोकांचा आग्रह आहे. तो रास्त आहे असे मला वाटते. त्याकडे मराठी समीक्षकांनी सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. नव्या गोष्टींचे पारंपरिक पद्धतीने आकलन न करता नव्याचा नव्या पद्धतीनेच विचार केला पाहिजे. त्यासाठी समीक्षेचा परीघ कसा व्यापक आणि विस्तृत होईल, याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. आर्थिक समृद्धी कधीच कुणी नाकारलेली नव्हती. पण, समाजाचा मूल्यविवेक हरवल्यामुळे चंगळवाद वाढत गेला. त्यामुळे, संवेदनशीलता हरवत गेली. विचारवंतांची कृतिशून्यता आणि कृतिवीरांची विचारशून्यता या दोन्ही गोष्टी समाजाला घातक आहेत. व्यक्‍तिमत्त्व नावाचे मूल्य बळकट करणे हाच त्याच्यावरचा उपाय आहे. त्यासाठी साहित्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे,’’ असे मत डॉ. जोशी यांनी मांडले. 

साहित्य परिषदेने संमेलने पाहावीत
साहित्य संमेलन हा मराठी समाजाचा वाड्‌मयीन उत्सव आहे. या उत्सवातून समाजाला एक नैतिक बळ मिळत असते. म्हणून अशी संमेलने होणे ही लोकांची भावनिक आणि वैचारिक गरज आहे. कुद्रेमानीसारख्या गावात मराठी साहित्य संमेलने यशस्वीरीत्या आयोजित केली जात आहेत. ही संमेलने अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने पाहिली पाहिजेत, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.

संमेलनाच्या उद्‌घाटक जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनीही मनोगत व्यक्त करताना मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. ‘‘मायमराठीचा जयजयकार, असे म्हणत असताना आपल्यातली ‘मराठी’पणाची ज्योत तेवत ठेवणे महत्त्वाचे आहे. भाषा आणि संस्कृतीची स्पंदने प्रथम मनात उमटतात; नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकटतात. केवळ दिखाऊपणासाठी मराठीचे प्रेम नको, आंतरिक जाणिवांतून ते प्रकट होत राहिले; तर भाषा आणि संस्कृती कधीच मरत नाही,’’ असे त्या म्हणाल्या.

तत्पूर्वी, कुद्रेमानी शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. बलभीम साहित्य संघाचे अध्यक्ष मोहन शिंदे यांनी प्रास्ताविक केले. हेमंत पाटील यांनी स्वागत केले. संमेलनाध्यक्ष डॉ. जोशी, उद्‌घाटक श्रीमती पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, निखिल देसाई, आर. आय. पाटील आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉ. सरिता गुरव-मोटराचे, शिवसंत पुरस्कार विजेते संजय मोरे, क्रीडापटू संकेत पाटील, मल्लाप्पा गुरव, श्री. देसाई यांचा संमेलनाध्यक्ष डॉ. जोशी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कुद्रेमानीतील कवी अमृत पाटील यांच्या ‘भविष्य शोधताना’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संमेलनाध्यक्षांच्या हस्ते झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum News Kudremani Marathi Sahitya Sanmelan