निपाणीत बुधवारी हरताळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

निपाणी - बुधवारी (ता. 17) हुतात्मा दिनी शहर परिसरात "बंद" ठेवून हरताळ पाळला जाणार आहे. "बंद" मध्ये शहर परिसरातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बंद यशस्वी करण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती व समितीचे निपाणी भाग अध्यक्ष जयराम मिरजकर यांच्यासह मराठी भाषिकांनी केले आहे. 

निपाणी - बुधवारी (ता. 17) हुतात्मा दिनी शहर परिसरात "बंद" ठेवून हरताळ पाळला जाणार आहे. "बंद" मध्ये शहर परिसरातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बंद यशस्वी करण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती व समितीचे निपाणी भाग अध्यक्ष जयराम मिरजकर यांच्यासह मराठी भाषिकांनी केले आहे. 

याबद्दल पत्रकातून मिरजकर यांनी दिलेली माहिती अशी, "1956 मध्ये भाषावार प्रांतरचनेनंतर झालेल्या पोलिस गोळीबारात निपाणीतील कमळाबाई मोहिते व बारवाडमधील गोपाळ चौगुले दोघेही हुतात्मे झाले. त्यांच्यासह अन्य हुतात्म्यांच्या स्मृती जागवून सीमालढ्याला बळ आणण्यासाठी हुतात्मा दिनी बंद पाळला जातो. दरवर्षी हुतात्मा दिनी कर्नाटक शासनाचा निषेध करण्यासाठी मूकमोर्चा काढण्याची देखील परंपरा आहे. 

बुधवारी सकाळी 11 वाजता बेळगाव नाक्‍यावरील बॅरिस्टर नाथ पै चौकात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत नाथ पै यांच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे. तेथून मूकमोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चा नगरपालिका, जुना पीबी रोडमार्गे साखरवाडीतील हुतात्मा कमळाबाई मोहिते यांच्या स्मृतीस अभिवादनास पोचणार आहे.

सर्व कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूरच्या महापौर स्वाती यवलुजे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे शहाजी कांबळे, गडहिंग्लज शिवसनेचे सुनील शिंत्रे उपस्थित राहणार आहेत. मूकमोर्चासह अभिवादन कार्यक्रमास समिती कार्यकर्त्यांसह शहर परिसरातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी विभागाकडून करण्यात आले आहे. 

शिवसेनेचे आवाहन 
येथे बुधवारी (ता. 17) हुतात्मा दिन पाळण्यात येणार असून यादिवशी सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून "बंद'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना निपाणी शाखेतर्फे आयोजित बैठकीत केले आहे. सीमालढ्यात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे, दिलावर गडकरी, विशाल हत्तरकी, हरीष तारळे, रमेश निकम, किरण पावले, श्री. सावरकर, पिंटू सुर्यवंशी, शरद बुडके, सूरज पोटले, रवि बागल, सतीश यादव, पप्पू सूर्यवंशी, अविनाश शिंदे, शीतल कासार, अशोक हावळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: Belgaum News NIpani Bandh on wensday