निपाणीजवळ ट्रक अपघातात घटप्रभेतील चालक ठार 

राजेंद्र हजारे
सोमवार, 29 जानेवारी 2018

निपाणी - घटप्रभा येथून कोल्हापूरकडे भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक दुभाजकाला धडकून उलटला. या अपघातात ट्रकचा चालक जागीच ठार तर एक महिला किरकोळ जखमी आहे.

निपाणी - घटप्रभा येथून कोल्हापूरकडे भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक दुभाजकाला धडकून उलटला. या अपघातात ट्रकचा चालक जागीच ठार तर एक महिला किरकोळ जखमी आहे. सोमवारी (ता. 29) रात्री दोनच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावर निपाणीजवळील सहारा हॉटेलशेजारी हा अपघात झाला. रहिमतुल्ला गौससाब बागवान (वय 55, रा. घटप्रभा) असे मृताचे नाव आहे. 

रहिमतुल्ला बागवान हे घटप्रभा परिसरातील भाजीपाला ट्रकमध्ये (केए 25 ए 4927) भरून कोल्हापूर मार्केटला निघाले होते. निपाणीजवळ राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल सहारा शेजारी दुभाजकाला ट्रकची धडक बसली. ट्रक वेगात असल्याने तो उलटला. यात बागवान हे ट्रकच्या खाली सापडल्याने त्यांच्या डोक्‍याला मार बसला. यावेळी महामार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण यात यश आले नाही. पुंज लॉईड कंपनीच्या क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून बागवान यांना बाहेर काढण्यात आले. मुख्य रस्त्यावरच ट्रक पलटी झाल्याने काहीकाळ वाहतूक खोळंबली होती. या काळात पुन्हा ट्रकला धडकून होणारे अपघात टाळण्यासाठी पुंज लॉईड कंपनीच्या सचिन हुक्केरी व कर्मचाऱ्यांनी सुमारे तासभर रस्त्यावर थांबून वाहतूक सुरळीत केली. 

सोमवारी सकाळी बसवेश्‍वर चौक पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर महात्मा गांधी रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

Web Title: Belgaum News one dead in an accident near Nipani