सौंदत्ती डोंगरावर लाखो भाविक दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जानेवारी 2018

बेळगाव - "उदे... गं आई... उदे... उदे...!' च्या गजरात अन्‌ भंडाऱ्याची उधळण करत बेळगाव परिसरातील लाखो भाविक सौंदत्ती डोंगरावर दाखल झाले आहेत. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त मंगळवारी (ता. 2) होणाऱ्या रेणुका देवी (यल्लम्मा) मुख्य यात्रेत ते सहभागी होणार आहेत.

बेळगाव - "उदे... गं आई... उदे... उदे...!' च्या गजरात अन्‌ भंडाऱ्याची उधळण करत बेळगाव परिसरातील लाखो भाविक सौंदत्ती डोंगरावर दाखल झाले आहेत. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त मंगळवारी (ता. 2) होणाऱ्या रेणुका देवी (यल्लम्मा) मुख्य यात्रेत ते सहभागी होणार आहेत. जोगणभावसह डोंगरावर सध्या सुमारे तीन लाख भाविकांचे वास्तव्य असून दोन दिवसात सात लाख भाविक देवीचे दर्शन घेतील, असा अंदाज आहे. 

मुख्य यात्रा मंगळवारी होत असली तरी चार दिवसांपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी डोंगरावर गर्दी केली आहे. डोंगरावर ठिकठिकाणी भाविकांनी तंबू ठोकले असून देवीचा अखंड जागर सुरू झाला आहे. बेळगुंदी, येळ्ळूरसह बेळगाव तालुक्‍यातील काही गावांतील भाविकांचा सामूहिक पडली भरण कार्यक्रम सोमवारी जोगणभावच्या ठिकाणी झाला.

जोगणभावीत पवित्र स्नान झाल्यानंतर भाविकांनी देवीचे दर्शन घेण्यास सुरवात केली. जोगणभावीतून भाविक स्थानिक जगासह पायीच देवीचा जयघोष आणि भंडाऱ्याची उधळण करीत देवी दर्शनासाठी डोंगरावर चढत होते. देवी दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दर्शनासाठी सुमारे चार ते पाच तास रांगेत थांबावे लागत होते. भंडाऱ्याची उधळण अखंड सुरु असल्यामुळे मंदिर सोन्याहून पिवळे दिसत होते. 

यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जोगणभावीतील देवदासी प्रथा रोखण्यासाठी महिला पोलिसांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात आली होती. नवी मोती बांधणे, पडल्या आदी धार्मिक कार्यक्रम याठिकाणी पार पडले. महिला आणि पुरुषांसाठी जोगणभावच्या शेजारीच स्नानासाठी शॉवरची व्यवस्था करण्यात आली होती. तर महिलांना वस्त्रे बदलण्यासाठी तात्पुरत्या खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

मंदिरावरही तिर्थ कुंडाच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानाची व्यवस्था करण्यात आली होती. डोंगरावर दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत असून मंगळवार आणि बुधवार (ता. 3) यात्रेचे मुख्य दिवस असणार आहेत. त्यादृष्टीने मंदिर व्यवस्थापनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. 

रिकामी बाटली दहा रुपयांना 
डोंगरावरील कुंडातील तिर्थ मिळविण्यासाठीही लोकांची गर्दी होती. त्यामुळे, याठिकाणी पाण्याची रिकामी बाटलीही 10 रुपयांनी विकली जात होती. डोंगरावर ठिकठिकाणी खेळण्या, स्टेशनरीचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. डोंगरावर मंदिर ट्रस्टकडून टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी अनेक ठिकाणी भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली. एक घागर पाण्यासाठी 50 रुपये आकारणी केली जात होती. 

Web Title: Belgaum News Soundatti Dongar Yatra