अकोळात सहा एकरातील ऊस खाक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

निपाणी - अकोळ येथे दोन शेतकऱ्यांच्या उसाच्या फडांना आग लागून सहा एकर 10 गुंठे जमिनीवरील पीक खाक झाले. मंगळवारी (ता. 30) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.

निपाणी - अकोळ येथे दोन शेतकऱ्यांच्या उसाच्या फडांना आग लागून सहा एकर 10 गुंठे जमिनीवरील पीक खाक झाले. मंगळवारी (ता. 30) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. शेतातून गेलेल्या वीजवाहिनींतून ठिणग्या पडल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला. आय. एन. बेग व सुनील अप्पासाहेब मलाबादे अशी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

अकोळ येथील नदीकाठावर सर्व्हे नं. 303 मध्ये आय. एन. बेग यांच्या साडेपाच एकर क्षेत्रात उसाचे पीक होते. गणेश रामनकट्टी व अर्जुन तावडे हे त्यांचे वाटेकरी आहेत. पिकाला काही दिवसांतच तोड येणार होती. पण अचानक आग लागल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कडक उन्ह असल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. बेग यांच्या शेजारीच असलेल्या सुनील मलाबादे यांच्या पाऊण एकर क्षेत्रातील ऊसही जळाला.

आगीची माहिती मिळताच निपाणीतील अग्निशामक दलाच्या बंबाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्‍यात आणली. दुपारनंतर हालसिद्धनाथ व अन्य साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांनी भेट देऊन ऊस नेण्याचे आश्‍वासन दिले. आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने हेस्कॉमने भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

Web Title: Belgaum News sugarcane burn incidence