सुळेभावीतील अपहरणाचा २४ तासांत छडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

बेळगाव - खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या पाच जणांना मारीहाळ पोलिसांनी रविवारी (ता. ७) अवघ्या चोवीस तासात जेरबंद करुन त्यांची रवानगी कारागृहात केलीे. अपहृत व्यक्ती सुरक्षित असून पोलिसांनी संशयितांकडून कार जप्त केली आहे. 

बेळगाव - खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या पाच जणांना मारीहाळ पोलिसांनी रविवारी (ता. ७) अवघ्या चोवीस तासात जेरबंद करुन त्यांची रवानगी कारागृहात केलीे. अपहृत व्यक्ती सुरक्षित असून पोलिसांनी संशयितांकडून कार जप्त केली आहे. 

विनायक वसंत पाटील (वय ३९), शाम वसंत पाटील (वय ३२, दोघेही रा. विनायक कॉलनी, शाहूनगर), प्रमोद प्रभाकर याळगी (वय २५, रा. वडगाव), प्रशांत उर्फ परशराम हणमंत देवण (वय ३२, रा. महाद्वार रोड) व गजानन देवरमनी (रा. कंग्राळ गल्ली) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सुळेभावी, कैलासनगरला फिर्यादी नागराज बसवराज परीट यांचे घर आहे. उपरोक्त संशयित शनिवारी (ता. ६) सायंकाळी सहा वाजता येथे आले. त्यांनी नागराज यांना जबरदस्तीने कारमध्ये (एमएच ०६ एएफ ७०२५) बसवून वडगावला आणले. त्याठिकाणी त्यांच्याकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर वडगावात डांबून ठेवले. 

दुसरीकडे या घटनेनंतर नागराज यांच्या घरी खळबळ उडाली. कुटुंबियांनी तातडीने मारीहाळ पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. विशेष पथकाची स्थापना करुन नागराज यांची महिती घेण्यास सुरुवात केली. ते वडगावमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याठिकाणी रविवारी छापा टाकून त्यांना सुरक्षित सोडविले. अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली. त्यावेळी पन्नास हजार रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, त्यांच्याविरोधात भादंवि १४३, १४७, ३६४ (अ), ५०६ सहकलम १४९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर हिंडलगा कारागृहात रवानगी केली. मारीहाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्योतीर्लिंग होनकट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. मारीहाळ पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Belgaum News Sulebhavi Kiddnaping case