बेस्ट संपाचे श्रेय कोण घेणार : 'मातोश्री' की "वर्षा' ?

Shivsena-Bjp
Shivsena-Bjp

मुंबई - बेस्टच्या संपाबाबत उद्या मातोश्रीवर तोडगा निघण्याची शक्‍यता वर्तविली जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मध्यस्ती करावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे वाटाघाटी यशस्वी करून संप मिटविण्याचे श्रेय कोण घेणार "मातोश्री' की "वर्षा' बंगला याकडे आता बेस्ट कामगारांचे लक्ष लागले आहे. 

सलग दोन दिवस बेस्टचा संप सुरू असून त्याबाबत अद्याप कोणताही तोंडगा निघू शकला नाही. त्यामुळे तोडगा काढणार कोण? शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत कमालीची उत्सूकता निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे हे बीडच्या दौऱ्यावर असून उद्या गुरुवारी ते मुंबईत येतील आणि बेस्ट प्रशासन, महापालिकेतील सत्ताधारी, गटनेते आणि मान्यताप्राप्त कामगार संघटना यांच्याशी चर्चा करून संपाबाबत यशस्वी तोडगा काढतील, असा विश्वास स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्यक्त केला. बेस्टच्या संपामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे, नोकरदारांचे आणि नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केली आहे. त्याबाबत पालिकेचे भाजपचे गटनेते मनोज कोटक यांना विचारले असता ते म्हणाले की, ती मागणी कॉंग्रेसची आहे. त्याबाबत आम्ही काय बोलणार? आपण मुख्यमंत्र्यांना मध्यस्ती करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्याशी काहीही चर्चा केलेली नाही. 

श्रेय घेण्यासाठी दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्रीही उद्याच मुंबईत दाखल होत आहेत. ते पालिका आयुक्त अजोय मेहता आणि बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून संपाबाबत तोडगा काढण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्र्यांनी वाटाघाटी केल्यास शिवसेनेला मोठी चपराक बसेल, अशी चर्चा बेस्टच्या वर्तूळात सुरू आहे. त्यामुळे संपावर तोडगा कुठे निघणार "वर्षा' बंगल्यावर की "मातोश्री'वर याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मनसेचा संपाला पाठिंबा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बेस्टच्या संपास पाठिंबा जाहिर केला आहे. बेस्ट कामगारांच्या लढाईत महाराष्ट्र मनसे कामगारांच्या पाठीशी राहिल अशी स्पष्ट भुमिका मनसेने घेतल्याचे मनसेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी यांनी जाहिर केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com