‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ राष्ट्रीय पुरस्कार जळगाव जिल्ह्याला प्रदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

जळगाव जिल्ह्याचा सन्मान

- देशातील 5 राज्ये सन्मानित

नवी दिल्ली : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जळगाव जिल्ह्यास ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देशातील 5 राज्ये व 20 जिल्ह्यांना केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभास महिला व बाल विकास मंत्री श्रीमती देवोश्री चौधरी, सचिव रविंद्र पनवर, अपर सचिव के. मोझेस चलाई तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्याचा सन्मान

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या राष्ट्रीय अभियानात जळगाव जिल्ह्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. या जिल्ह्याचे स्त्री-पुरूष प्रमाण 841 वरून 925 पर्यंत पोहोचले आहे. यापूर्वी ही या जिल्ह्यास या कामाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी ही ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल जळगाव जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला आहे.

जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी जळगाव जिल्ह्याचे महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंह परदेशी उपस्थित होते.

देशातील 5 राज्ये सन्मानित

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्रीमती स्मृती इराणी यांच्या हस्ते हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, तर पूर्व कामेन्ग-अरुणाचल प्रदेश, महेंद्रगढ- हरयाणा, उधमसिंह नगर- उत्तराखंड, नामाक्कल-तामिळनाडू, भिवानी- हरयाणा, जळगांव- महाराष्ट्र, इटावा- उत्तरप्रदेश, रायगड़- छत्तीसगढ, रेवा- मध्यप्रदेश व राजस्थान येथील जोधपूर या 10 जिल्ह्यांचाही ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

तसेच तिरुवल्लुर -तामिलनाडू  अहमदाबाद-गुजरात, मंडी- हिमाचलप्रदेश, जम्मू व काश्मीर- किश्तवार, कर्नाटक- गडाक, हिमाचल प्रदेश- शिमला, नागालँड-ओखा, उत्तरप्रदेश-फरुक्काबाद, हिमाचल प्रदेश- सिरमौर व नागौर –राजस्थान या 10 अतिरिक्त जिल्ह्यांना प्रोत्साहनपर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

(सौजन्य : डीजीआयपीआर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beti Bachao Beti Padhao National Award conferred to Jalgaon district