सावधान...फसवी आहे पंतप्रधान सायकल योजना ! 

परशुराम कोकणे
रविवार, 22 जुलै 2018

पंतप्रधान सायकल योजना खरी नाही. आपली माहिती संकलित करून आर्थिक फसवणूक करण्याचा हेतू काही मंडळी करत आहेत. अशाप्रकारच्या मेसेजवर विश्‍वास ठेवू नका. असे मेसेज इतरांना फॉरवर्ड करू नका. ज्यांनी या योजनेसाठी माहिती ऑनलाइन भरली आहे, त्यांनी आपला ईमेलचा पासवर्ड, बॅंकेचा पिन नंबर तत्काळ बदलावा. 

- मधुरा भास्कर, पोलिस उपनिरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

सोलापूर : विद्यार्थिंनींसाठी खुशखबर...भारत सरकारच्या वतीने प्रधानमंत्री सायकल योजनेअंतर्गत मोफत सायकल वाटप सुरू आहे...असा खोटा मेसेज गेल्या आठवड्यापासून सगळीकडे व्हायरल होत आहे. भारत सरकार डॉट कॉम या बनावट वेबसाइटवर हा डाटा संकलित केला जात असून, नेटिझन्सनी सावध व्हावे, अशी कोणतीही योजना नाही. यातून ऑनलाइन आर्थिक फसवणूक होऊ शकते, असे सायबर पोलिसांनी सांगितले. 

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. आपली वैयक्तिक माहिती चोरून आर्थिक फसवणूक केली जात आहे. पंतप्रधान सायकल योजना, हेल्मेट योजना, बॅग योजना, पुस्तक योजना, लोन योजना अशा योजनांची नावे देऊन आपला डाटा जमविला जात आहे. पंतप्रधान सायकल योजनेच्या नावाखाली भारत सरकार डॉट कॉम या साइटवर माहिती एकत्रित केली जात आहे. काहीतरी मोफत मिळतेय म्हणून कोणताही विचार न करता त्या लिंकवर जाऊन नेटिझन्स आपली माहिती भरत आहेत. हा मेसेज खरा आहे की खोटा आहे हे समजून न घेता लोक आमिषाला बळी पडत आहेत. 

वेबसाइट खरी आहे की खोटी हे आधी समजून घ्यावे. ज्या वेबसाइटची सुरवात http:// ने होते अशा सर्व वेबसाइट फेक असतात. कृपया अशा वेबसाइटवर क्‍लिक करू नये, अन्यथा तुमचा सर्व डाटा चोरीला जाऊ शकतो. अशा वेबसाइट माध्यमातून हॅकर मंडळी फसवणूक करण्याच्या दृष्टीने वापरतात. वेबसाइटची सुरवात https:// होत असेल तर तर वेबसाइट सुरक्षित आहे असे समजावे, असे सायबर पोलिसांनी सांगितले.

Web Title: Beware for scheme of PM Cycle Plan