भिरा @46.5

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

पुणे - उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असून, गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यात उच्चांकी तापमानाची नोंद झाली. राज्यात भिरा येथे सर्वाधिक म्हणजे 46.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. नंदुरबार (45.2), जळगाव (44), धुळे (43) येथेही उन्हाचा चटका वाढला; तर पुण्याच्या तापमानाच्या पाऱ्याने मार्चमध्येच चाळिशीपर्यंत उसळी मारली. पुढील तीन दिवसांनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

राज्यात चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी वैशाख वणव्याप्रमाणे उन्हाचा चटका लागला. संपूर्ण महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍याने होरपळून निघाला. राज्यातील 18 प्रमुख शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली असल्याचे नोंद हवामान खात्यात झाली.

पुण्याने ओलांडली चाळिशी
मार्चच्या अखेरच्या आठवड्यातच पुण्यातील कमाल तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 40.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्याच वेळी राज्यातील नीचांकी किमान तापमान पुण्यात नोंदविण्यात आले. किमान तापमानात सरासरीपेक्षा एक अंश सेल्सिअसने कमी होऊन 16.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानातील आंतर वाढल्याची माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. राज्यात सोमवारी (ता. 27) गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. हा उच्चांक मागे टाकत आज पुण्याने मार्चमधील 40.1 अंश सेल्सिअसचा मार्चमधील नवीन उच्चांक नोंदविला, असेही हवामान खात्यातर्फे कळविण्यात आले.

तीन दिवसांनंतर पावसाची शक्‍यता
कर्नाटकच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच, स्थानिक वातावरणाच्या परिणामांमुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. उत्तरेकडून येत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात दमटपणा तयार झाला आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंशांपर्यंत वाढ झाली आहे. राज्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. संपूर्ण राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. पुणे परिसरात शनिवार आणि रविवार वगळता आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.

Web Title: bhira @ 46.5 temperature