भुलेश्वरी श्रावणी यात्रेबाबत प्रशासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

दत्ता जाधव
Friday, 17 July 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने श्रावण महिन्यातील भुलेश्वर यात्रेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

माळशिरस : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने श्रावण महिन्यातील भुलेश्वर यात्रेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता ही यात्रा रद्द करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. संपूर्ण श्रावण महिन्यात भाविकांना मंदिर प्रवेशासाठी बंद असणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भुलेश्वर येथे संपूर्ण महिनाभर भाविकांची मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी असते  व दर सोमवारी लाखो भाविकांच्या संख्येत यात्रा भरतात. पुढील महिन्यापासून श्रावण महिना सुरू होत असल्याने या पार्श्वभूमीवर व सद्यस्थितीत कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर वाढलेले प्रमाण यामुळे प्रशासनाच्या वतीने आज तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्या उपस्थितीत भुलेश्वर येथे देवस्थान व माळशिरस ग्रामपंचायत व ग्रामस्थांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सरपंच महादेव बोरावके व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अरुण यादव यांनी गावची व देवस्थानची भूमिका मांडली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी कोरोनामुळे संपूर्ण महिनाभर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याबरोबरच श्रावण महिन्यातील येथील यात्रा देखील रद्द करण्याबाबतचा निर्णय प्रशासनाने निश्चित केला असल्याचे सांगितले. तसेच श्रावण महिन्यात दर सोमवारी निघणारी पालखी व शिखर कावडी देखील काढता येणार नसल्याबाबतचे त्यांनी स्पष्ट केले. मंदिराची नियमित पूजा पुजारी करतील. त्या व्यतिरिक्त इतर कोणालाही मंदिर परिसरामध्ये प्रवेश नसणार असल्याचे तहसीलदारांनी प्रशासनाच्या वतीने स्पष्ट केले.

देवाचा पुण्यात असणाऱ्या मुख्य मुखवट्याची आहे त्या ठिकाणी पूजा करण्याबाबत येथील पुजाऱ्यांना सांगण्यात आले आहे. यावेळी जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी मंदिर परिसरात कुणी प्रवेश केल्यास त्यांच्यावर रीतसर प्रशासकीय कारवाई केली जाईल. दोन्ही प्रवेश द्वारावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंदिराच्या लगतच्या परिसरात असणाऱ्या वन विभागात श्रावण महिन्याच्या काळात कोणीही प्रवेश केल्यास वन विभागाच्या वतीने त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे वनक्षेत्र अधिकारी जयश्री जाधव-जगताप यांनी सांगितले.

यावेळी मंडळ अधिकारी भिसे, गावकामगार तलाठी सतीश काशिद सरपंच महादेव बोरवके, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अरूण यादव उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhuleshwari Shravani Yatra will not Organized Important decision taken by the administration of Malshiras