

Police and intelligence officials investigate reports of an Al-Qaeda-linked individual’s visit to Solapur’s Kumbhari area.
Sakal
सोलापूर : पुणे येथील कोंढव्यात राहणारा मूळचा सोलापुरातील असलेल्या जुबेर हंगरगेकर याला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित काही वस्तू त्याच्याकडे आढळल्या आहेत. त्याअनुषंगाने ‘एटीएस’चे पथक सोलापुरात आले होते. त्यांनी जुबेरच्या संपर्कातील एका वर्गमित्राच्या सोलापुरातील भावाला पुण्याला नेले. तसेच वर्गमित्रालाही बुधवारी पुण्यातून ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सोलापूर शहर पोलिसांनी दिली.
सोलापूर शहरात रहायला असलेला जुबेर सात वर्षांपूर्वी कोंढवा येथे रहायला गेला होता. तो एका स्वॉप्टवेअर कंपनीत इंजिनिअर म्हणून जॉब करतो. पुण्यात दहशतवादविरोधी पथकाने अल कायदा दहशतवादी संघटनेशी संबंधित काही तरुणांना पकडले. त्यात हा जुबेरदेखील असून त्याच्याकडे बऱ्याच संशयास्पद गोष्टी आढळल्या आहेत.
जुबेरचा शोएब नावाचा सोलापुरातील वर्गमित्र आहे. तो देखील पुण्यात रहायला असून जुबेरचा त्याच्याशी खूप संपर्क होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तर शोएबचा भाऊ सोलापुरात शिक्षक असून तेही शोएब व जुबेरच्या संपर्कात होते. या पार्श्वभूमीवर ‘एटीएस’ने त्यांनाही चौकशीसाठी सोलापुरातून पुण्याला नेले होते. त्यांना चौकशीनंतर सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
जेलरोड पोलिस, वळसंग पोलिसांकडूनही तपास
वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत १८ ते २० ऑक्टोबरला एका संस्थेने कार्यक्रम घेतला. त्या संस्थेचे पदाधिकारी कर्णिक नगरातील आहेत. त्यांच्याकडेही पोलिस चौकशी करीत आहेत. त्या कार्यक्रमासाठी जुबेर का आला होता?, त्याठिकाणी तो काय बोलला?, कोणासोबत आला होता?, या बाबींचा तपास सुरू आहे. या अनुषंगाने पोलिसांनी कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रण, फोटो मागितले आहेत. वळसंग पोलिसही त्या शाळेचे प्राचार्य, शिक्षकांकडे चौकशी करीत आहेत. दरम्यान, जेलरोड पोलिस या प्रकरणाच्या अनुषंगाने दोघांची चौकशी करीत आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे. ‘एटीएस’ने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गुप्तवार्ता विभाग व सोलापूर शहर पोलिस तपास करीत आहेत.