मोठी बातमी! शेतकऱ्यांना शेती तारण कर्ज द्यायला बॅंकांचा नकार; पीककर्ज देण्यापूर्वी तपासला जातो शेतकऱ्याचा ‘सिबिल’ स्कोअर अन्‌...

शेती तारण कर्जाची (मॉर्टगेज) थकबाकी दरवर्षी वाढते आणि शेतकरी कर्जमाफीची आशा करतात, यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांनी शेती तारण कर्जावर फुली मारली आहे. दुसरीकडे पीककर्ज देण्यापूर्वी देखील तो शेतकरी दुसरीकडे कोठे थकबाकीत नाही ना, याच्या पडताळणीसाठी त्याचे ‘सिबिल’ पाहिलेच जाते. त्याशिवाय पीककर्ज दिलेच जात नाही, असे बॅंकांचे अधिकारीच सांगतात.
पीककर्जासाठी बॅंकांची अट
पीककर्जासाठी बॅंकांची अटSakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : शेती तारण कर्जाची (मॉर्टगेज) थकबाकी दरवर्षी वाढते आणि शेतकरी कर्जमाफीची आशा करतात, यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांनी शेती तारण कर्जावर फुली मारली आहे. दुसरीकडे पीककर्ज देण्यापूर्वी देखील तो शेतकरी दुसरीकडे कोठे थकबाकीत नाही ना, याच्या पडताळणीसाठी त्याचे ‘सिबिल’ पाहिलेच जाते. त्याशिवाय पीककर्ज दिलेच जात नाही, असे बॅंकांचे अधिकारीच सांगतात.

राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी सोलापूर, अहिल्यानगर, अमरावती, जालना, मुंबई, नागपूर, बीड, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे, वर्धा, यवतमाळ व धुळे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकडे तब्बल ३० हजार कोटींची थकबाकी आहे. यात सोलापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील पावणेतीन लाख शेतकऱ्यांकडे तीन हजार ९७६ कोटींची थकबाकी आहे. त्यात मॉर्टगेज (शेती तारण कर्ज) लोनची थकबाकी सर्वाधिक असल्याचे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीकडील नोंदीवरून समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर बॅंकांनी आता शेती तारण कर्जात हात आखडता घेतला आहे. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत तर शेती तारण कर्ज हा प्रकारच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता बॅंकांकडून अधिकाधिक तीन लाखांपर्यंतच कर्ज मिळत आहे, त्यावरील कर्ज नाकारले जात असल्याचे अनुभव शेतकऱ्यांना येत आहेत.

तारण कर्जाचा वापर मुख्य उद्देशासाठी होत नाही

शेती तारण कर्जातून शेतकऱ्यांची शेतीसंबंधीची कामे व्हावीत या हेतूने बॅंका तारण (मॉर्टगेज) कर्ज देतात. मात्र, ते पैसे दुसऱ्याच कामासाठी वापरले जातात. त्यामुळे शेती तारण कर्जाची थकबाकी वाढत असल्याचे दिसून येते. यामुळे काही बॅंकांनी शेतीचे मॉर्टगेज लोन बंद केले असेल, पण तो विषय आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.

- राम वाखरडे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर

‘सिबिल’द्वारे पाहिली जाते थकबाकी

शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बॅंकांनी सिबिल स्कोअर पाहू नये, असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आहेत. पण, अधिकारी म्हणतात, ‘कर्ज देण्यापूर्वी बॅंका त्या शेतकऱ्याकडे इतर कोणत्या बॅंका किंवा वित्तीय संस्थेचे कर्ज थकबाकीत आहे का, याच्या पडताळणीसाठी आम्ही सिबिल पाहतो’. दरम्यान, अनेकदा सिबिल स्कोअर ६०० ते ६५० पेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यास कर्ज दिले जात नाही. त्याबद्दल शेतकरी उघडपणे कोठे तक्रार करत नसल्याने ही बाब बॅंकेतच दबून राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com