मोठी बातमी! रोज किमान 10,000 घरगुती गॅस सिलिंडरचा काळा बाजार; सोलापूर जिल्ह्यात शासनाला दरमहा अंदाजे 15 कोटी रुपयांचा चुना; ‘LPG’ पंपचालकही चिंतेत

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रोज सरासरी ५७ हजार घरगुती गॅस सिलिंडर वितरित होतात. त्यापैकी किमान १० ते ११ हजार घरगुती गॅस सिलिंडर काळ्या बाजारात विकले जातात, असा अंदाज आहे. यामुळे एलपीजी पंपचालक-मालक चिंतेत सापडले आहेत. त्यांनी पंप सुरू करूनही त्यांचा गॅस विकला जात नाही, अशी वस्तुस्थिती समोर आली आहे.
LPG Gas Cylinder Rates Hike
LPG Gas Cylinder Rates Hikeesakal
Updated on

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रोज सरासरी ५७ हजार घरगुती गॅस सिलिंडर वितरित होतात. त्यापैकी किमान १० ते ११ हजार घरगुती गॅस सिलिंडर काळ्या बाजारात विकले जातात, असा अंदाज आहे. यामुळे एलपीजी पंपचालक-मालक चिंतेत सापडले आहेत. त्यांनी पंप सुरू करूनही त्यांचा गॅस विकला जात नाही, अशी वस्तुस्थिती आहे. घरगुती गॅस हा व्यावसायिक गॅसपेक्षा प्रती किलो ३७ रुपयांनी स्वस्त आहे. यातून काळा बाजार करणारी टोळी महिन्याला १५ कोटी रुपये घशात घालत असण्याची शक्यता आहे. परिणामी, शासनाचे दरमहा किमान १५ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

१९ किलो व्यावसायिक गॅस सिंलिंडरची किंमत १८०० रुपये तर १४ किलो घरगुती गॅस सिलिंडर ८१० रुपयाला मिळतो. त्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिक, रिक्षाचालकांना एलपीजी किंवा व्यावसायिक गॅस परवडत नाही. या पार्श्वभूमीवर ते घरगुती सिलिंडरचाच गैरवापर करतात, अशी स्थिती शहर-जिल्ह्यात पहायला मिळते. सोलापूर शहरात घरगुती एलपीजी सिलिंडरचा बेकायदेशीरपणे वापर होतोय, अशी तक्रार एलपीजी पंप मालक-चालकांनी देखील यापूर्वी केली आहे. सोलापूर शहरात ७ एलपीजी गॅस पंप आहेत, पण त्यांचा केवळ २० टक्केच गॅस विकला जातोय, असेही त्यांनी म्हटले आहे. शहरातील असंख्य वाहनांमध्ये अनधिकृतपणे घरगुती गॅस सिलिंडर भरला जातो, तशा कारवाया यापूर्वी झाल्या आहेत. सार्वजनिक रस्त्यांवरील खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांवर घरगुती गॅस सिलिंडर दिसतात, तरी कारवाई होत नाही. दुसरीकडे त्यावर पोलिसांनी कारवाई करावी की पुरवठा विभागाने असाही अधिकाराचा वाद आहेच.

दरम्यान, गॅस कंपनीच्या निकषानुसार प्रत्येक गॅस एजन्सीच्या किमान ८० टक्के ग्राहकांनी ऑनलाईन बुकिंग करुन घरगुती गॅस सिलिंडर घेणे अपेक्षित आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना २० टक्के ऑफलाइन बुकिंगसाठी सूट देण्यात आली आहे. पण सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मिळून दरमहा ३८ टक्के घरगुती गॅस सिलिंडर ऑफलाइन पद्धतीने वितरित करण्यात येतात. आजकाल जवळ जवळ प्रत्येक कुटुंबाकडे मोबाइल फोन आहे. त्यामुळे १०० टक्के ऑनलाइन बुकिंग केल्यास पारदर्शकता येईल. निकषानुसार ८० टक्के ग्राहकांनी जरी ऑनलाइन बुकिंग केली तरी शासनाचे दरमहा जिल्ह्यात १५ कोटी रुपये वाचणार आहेत. सध्या असंख्य छोट्या-मोठ्या व्यावसायिकांकडे घरगुती गॅस सिलिंडर आढळतात. गॅस कपंन्यांचे अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी किंवा जिल्हा पुरवठा विभाग यांच्याकडून ठोस कारवाई होताना दिसली नाही.

घरगुती सिलिंडर बुकिंगची सद्य:स्थिती

  • २१ दिवसाला येणारे सिलिंडर

  • ११,९७,४४९

  • अपेक्षित ऑनलाईन बुकिंग

  • ९.५० लाख

  • सध्या अंदाजे ऑनलाईन बुकिंग

  • ७.२० लाख

  • ऑफलाईन बुकिंग

  • २.३० लाख

  • दररोज ऑफलाइन विक्री

  • सुमारे २१२८५

गॅस सिलिंडर बुकिंगची पद्धत, अन्‌...

कनेक्शनधारकास व्हॉट्‌सॲपवरून किंवा त्यांच्या मोबाईलवरून कंपनीच्या नंबरवर मिसकॉल देऊन ऑनलाइन बुकिंग करता येते. किमान ८० टक्के बुकिंग ऑनलाइन अपेक्षित असून २० टक्के मॅन्युअली बुकिंगसाठी सूट दिली जाते. तत्पूर्वी, गॅस कंपनीच्या ‘आयव्हीआरएस’नंबरवर ग्राहकाने मिसकॉल दिल्यावर गॅस बुकिंग होतो. त्यानंतर त्या ग्राहकाला ‘डीएसी’ नंबर मिळतो आणि तो नंबर डिलिव्हरी बॉयला दिल्यावर गॅस मिळतो, अशी प्रचलित पद्धत आहे. पण, मॅन्युअली बुकिंगसाठी हा कोड बंधनकारक नसतो.

‘उज्वला’च्या घरात एकापेक्षा जास्त कनेक्शन

केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी कुटुंबातील रेशनकार्डवरील प्रत्येक व्यक्तीचे आधारकार्ड नोंदवून त्या कुटुंबाला एकच गॅस कनेक्शन देणे अपेक्षित आहे. मात्र, रेशनकार्डवरील सर्वांचे आधारकार्ड न घेता एकाचेच आधारकार्ड नोंदविल्याने सध्या ‘उज्वला’च्या कुटुंबात एकापेक्षा अधिक कनेक्शन आहेत. १२ लाख लोकसंख्येच्या सोलापूर शहरात अवघे १४५८ तर ग्रामीणमध्ये एक लाख ६९ हजार ‘उज्वला’ योजनेचे गॅस कनेक्शन आहेत, अशी नोंद संबंधित विभागाकडे आहे.

...तर निश्चित कारवाई होईल

व्यावसायिकांनी घरगुती गॅसचा वापर करावा, अन्यथा कारवाईत तो सिलिंडर जप्त करून गुन्हा दाखल होऊन दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते. घरगुती गॅसचा कोणी गैरवापर करत असल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल.

- संतोष सरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com