

तात्या लांडगे
सोलापूर : राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने सहकार खात्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून माहिती मागविली आहे. ३० जून २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची व चालू बाकीदारांच्या माहितीचा त्यात समावेश आहे. त्यामुळे ३० जून २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार ही तारीख निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील एक कोटी ३३ लाख ४४ हजार २०९ शेतकऱ्यांना बॅंकांनी पावणेतीन लाख कोटींचे कर्जवाटप केले. त्यातील २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील ३५ हजार ४७७ कोटी रुपयांचे कर्ज मुदतीत भरलेच नाही. त्यामुळे तेवढे शेतकरी आता थकबाकीदार झाले आहेत. राज्य सरकारने २०१७ मध्ये शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची तर २०१९ मध्ये शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली. मात्र, अर्धवट कर्जमाफीमुळे ज्या शेतकऱ्यांना तेवढी रक्कम देखील भरणे अशक्य होते, त्यांना लाभ घेता आला नाही.
त्यानंतर दुष्काळ, अतिवृष्टी, महापुरामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा उताराच कोरा होईल, अशी कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे नियोजन असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी, सरकारने नेमलेली समिती कर्जमाफीसाठी पात्र कोण, याचे निकष निश्चित करणार आहे. त्यासाठी सहकार व कृषी विभागाचे आयुक्तांचीही मदत घेतली जात आहे. सतत थकबाकीदार झालेले व आतापर्यंत कधीही थकबाकीत न गेलेले शेतकरी, दोघांचीही पीकपद्धती, या सर्व बाबींचा अभ्यास करून समिती १० एप्रिलपर्यंत राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे.
पोर्टल तयार करण्याचे काम सहकार विभागाकडून सुरु
शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने माहिती तयार करण्याच्या सूचना बॅंकांना दिल्या आहेत. त्यासाठी सहकार खात्याकडून स्वतंत्र पोर्टल तयार केले जात आहे. त्यावर सर्व बॅंकांना कर्जदारांची माहिती ऑनलाईन भरावी लागेल. शेतकऱ्यांकडील थकबाकीच्या अडचणींवर दिर्घकालिन उपाययोजनांसंदर्भात समितीने कृषी आयुक्तांना अभ्यास करण्यास सांगितले आहे.
- दिपक तावरे, सहकार आयुक्त, पुणे
दररोज सात शेतकरी आत्महत्या
राज्यात दरवर्षी सरासरी २६०० (दररोज सरासरी सात) शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची नोंद मदत व पुनवर्सन विभागाकडे आहे. अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नाशिक या विभागात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे दिसते. जवळगाव, नांदेड, बीड, धाराशिव, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आत्महत्याची नोंद आहे.
कर्जाच्या थकबाकीची सद्य:स्थिती
एकूण शेतकरी
१,३३,४४,२०९
एकूण कर्जवाटप
२,७८,२६५ कोटी
थकबाकीतील शेतकरी
२४,७३,५६६
एकूण थकबाकी
३५,४७७ कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.