
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये अनेकजण सद्य:स्थितीत संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी आहेत. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी देखील आहेत. याची पडताळणी होणार असून तत्पूर्वी, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या नवीन लाभार्थींना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसल्याची ‘एनओसी’ (नाहरकत प्रमाणपत्र) द्यावी लागणार आहे.
१ जुलैपासून सुरु झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत सोलापूर जिल्ह्यातून पावणेअकरा लाख तर राज्यातून अडीच कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केले. त्यानंतर अर्जासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, पण विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्या अर्जांवर काहीच निर्णय होऊ शकला नाही. आता राज्यातील त्या कालावधीतील जवळपास २० लाख अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ५६ हजार २२९ अर्जांपैकी ५० हजार ३९९ अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पाच हजार ८३० अर्जांची तपासणी सुरु असल्याची माहिती महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली. दरम्यान, अर्जांची तपासणी करताना त्या अर्जदार महिला दुसऱ्या वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनेचा लाभ घेताहेत का, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का अशा बाबी पाहिल्या जात आहेत. दरम्यान, शासन स्तरावरुन अद्याप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पूर्वी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी करण्यासंदर्भातील कोणतेही निर्देश तथा आदेश नाहीत. त्यामुळे शासनाचे आदेश येईपर्यंत कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केले आहे.
निराधार योजनेच्या नवीन अर्जदारांकडून एनओसी घेतली जाईल
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थी या शासनाच्या दुसऱ्या कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या योजनेतून अनुदान घेत नसाव्यात अशी अट आहे. या पार्श्वभूमीवर आता निराधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्यांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून लाभ घेत नसल्याचे नाहरकत प्रमाणपत्र घेतले जाईल. जेणेकरून दोन्हीकडे त्यांची नावे येणार नाहीत.
- शिल्पा पाटील, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना, सोलापूर
अनुदान वितरणापूर्वी ‘निराधार’च्या लाभार्थींची चाळणी
सोलापूर जिल्ह्यात एक लाखांपर्यंत तर राज्यभरात ६० लाखांहून अधिक महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्यापूर्वी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थींची यादी महिला व बालकल्याण विभागाकडे सुपूर्द करण्यात आली होती. मात्र, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अडीच कोटी अर्जांची पडताळणी युद्धपातळीवर सुरु असल्याने दोन्ही योजनांमध्ये एकाच लाभार्थीने अर्ज केल्याची खात्री काटेकोरपणे होऊ शकली नाही. आता निराधार योजनेचा लाभ वितरित करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या यादीत या योजनेतील कोणी आहेत का, याची खातरजमा केली जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.