

तात्या लांडगे
सोलापूर : पंढरपूरजवळील कासेगाव येथील २० हेक्टरवर (५० एकर) छोटी एमआयडीसी उभारली जात आहे. जागेचे संपादन काही दिवसांत सुरू होणार आहे. १९७० आणि १९९० मध्ये संपादित झालेल्या सोलापूर व चिंचोली एमआयडीसीतील जागा आजही ७१० आणि ५५० रुपये चौरस मीटरने मिळत असताना, कासेगावात नव्या मिनी एमआयडीसीसाठी तब्बल ३५०० रुपये चौरस मीटर दर ठरविला आहे. याबाबत एमआयडीसीकडे उद्योजकांनी खंत व्यक्त केली आहे.
राज्याची धार्मिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पंढरीत दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी येतात. या पार्श्वभूमीवर कासेगाव येथे एमआयडीसी उभारली जात आहे. त्यासाठी स्थानिक आमदारांनी पाठपुरावा केला होता. ५० एकर जागेत उद्योजकांनी जागेची मागणी नोंदविली आहे. पण, जिल्ह्यातील अन्य एमआयडीसींच्या तुलनेत कासेगावातील जागेचा दर जास्त असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. या भागात मोठी एमआयडीसी उभारू शकते, पण जागेचे दर कमी असावेत, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे चिंचोली एमआयडीसीअंतर्गत १५१ हेक्टर जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव धुळखात पडून आहे. त्यावर आता तेवढी जागा तातडीने उद्योजक घेऊन उद्योग सुरू करतील का, यासंदर्भातील माहिती उद्योग विभागाने अधिकाऱ्यांकडून मागविली आहे. १९९० मध्ये संपादित झालेली चिंचोली एमआयडीसीतील सगळी जागा आता उद्योगांनी व्यापली आहे. त्यामुळे उद्योग विभागाने सावध पवित्रा घेतल्याचे अधिकारी सांगतात.
आयटी पार्क, माळशिरस, कासेगाव, चिंचोली एमआयडीसीला प्राधान्य
सोलापूर जिल्ह्यातील होटगी येथील आयटी पार्कसह, माळशिरस, कासेगाव आणि अतिरिक्त चिंचोली येथील प्रस्तावित एमआयडीसींच्या जागेसंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. आयटी पार्कची जागा हस्तांतरण करण्यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहे. अतिरिक्त चिंचोलीत किती उद्योजकांची मागणी आहे, याची माहिती मागविली आहे. कासेगाव येथील २० हेक्टरचेही भूसंपादन होईल.
- शिवाजी राठोड, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, सोलापूर
कुंभारी एमआयडीसी कागदावरच
कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे ९४६ हेक्टरवर नवीन एमआयडीसी प्रस्तावित आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून अक्कलकोट, दक्षिण सोलापूरसह जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळेल म्हणून स्थानिक आमदारांनी नेहमीच पाठपुरावा केला. परंतु, एमआयडीसीच्या जागेत जलसंपदा विभागाची काही जागा असून, त्यासाठी ‘जलसंपदा’ने २३ कोटी मागितले आहेत. परंतु, अजूनपर्यंत ना त्या पैशाचाही विषय मिटला ना भूसंपादनाला सुरवात झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.