मोठी बातमी! सोलापूर शहराला १ एप्रिलपासून आठवड्यात तीनवेळा पाणी; समांतर जलवाहिनीचे काम दीड कि.मी. राहिले; उजनी धरण उणे ८० टक्के झाल्यावरही पाणीपुरवठा राहणार सुरळीत

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची नवी समांतर जलवाहिनी १५ मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. १५ दिवस धरणातून पाणी उपसा करून प्रात्यक्षिक केले जाणार असून, त्यानंतर १ एप्रिलपासून शहराच्या गावठाण भागाला (मूळ शहर) एकदा दोन आणि एकदा तीन दिवसांआड, असे आठवड्यातून तीनवेळा पाणी सोडले जाईल.
solapur
sakal breakingsolapur
Updated on

सोलापूर : सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची नवी समांतर जलवाहिनी १५ मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. १५ दिवस धरणातून पाणी उपसा करून प्रात्यक्षिक केले जाणार असून, त्यानंतर १ एप्रिलपासून शहराच्या गावठाण भागाला (मूळ शहर) एकदा दोन आणि एकदा तीन दिवसांआड, असे आठवड्यातून तीनवेळा पाणी सोडले जाईल. त्यादृष्टीने नियोजन केल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सोलापूर ते उजनी या ११० कि.मी. समांतर जलवाहिनीचे काम सध्या दीड कि.मी. राहिले आहे. आता देगाव नाल्यातून पाइप जोडणी सुरू असून, टेंभुर्णी बायपासजवळील काम देखील पूर्ण झाले आहे. कुरूल- कामती रोडवर (मोहोळ शहराजवळ) पाइप जोडणी सुरू असून, तेथे ५० मीटर काम राहिले आहे. याशिवाय वडाचीवाडी व देवडी येथे दोन शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीतून जलवाहिनी जाणार असल्याने त्यांना मोबदला देऊन ते काम पूर्ण केले जाणार आहे. तसेच धरणापासून मुख्य रस्त्यापर्यंत ६०० मीटर काम बाकी आहे. आगामी २० दिवसांत ही अर्धवट कामे पूर्ण केली जाणार आहेत. तत्पूर्वी, धरणावरील चार पंपहाउसचे प्रात्यक्षिक यशस्वी झाले असून, विजेची जोडणी देखील करण्यात आली आहे.

जलवाहिनी पूर्ण झाल्यावर बटण दाबल्यावर पाणी उपसा सुरू होणार आहे. ते पाणी सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रावर आणून तेथे प्रक्रिया करून शहराला दिले जाणार आहे. त्यावेळी औज बंधाऱ्यातून घेतले जाणारे पाणी बंद केले जाणार आहे. नदीतून घेतलेल्या पाण्यावर खूप प्रक्रिया करावी लागते, त्यासाठी वेळही लागतो. पण, समांतर जलवाहिनीतून थेट धरणातून पाणी उपसा होणार असल्याने त्यावरील प्रक्रिया लगेच होऊ शकते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

१ एप्रिलपासून पाणीपुरवठ्यात चांगला बदल शक्य

समांतर जलवाहिनीचे काम १५ मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर १५ दिवस जलवाहिनीतून पाणी उपसा करून संपूर्ण लाइन तपासली जाईल. १ एप्रिलपासून नव्या जलवाहिनीमधून सोरेगाव पंपहाउसवर पाणी आणून तेथून प्रक्रिया करून शहराच्या गावठाण भागाला वेळ कमी करून प्रत्येक आठवड्यात एकदा दोन व एकदा तीन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन आहे.

- व्यंकटेश चौबे, अभियंता, सार्वजनिक आरोग्य व पाणीपुरवठा, सोलापूर महापालिका

उजनी उणे ८० टक्के झाल्यावरही मिळेल पाणी

सध्या उजनी धरण उणे ३२ टक्के झाल्यावर जुन्या जलवाहिनीमधून पाणी घेण्यासाठी दुबार पंपिंग करावे लागते आणि धरणातील पाणीसाठा उणे ५२ टक्के झाल्यावर तिबार पंपिंग करावे लागते. त्यावर किमान एक-दीड कोटींचा खर्च होतो. मात्र, आता नव्या समांतर जलवाहिनीमुळे धरण उणे ८० टक्के होईपर्यंत पूर्ण क्षमतेने सोलापूर शहरासाठी पाणी उपसा करता येणार आहे. त्यामुळे दुबार-तिबार पंपिंगवरील कोट्यवधींचा खर्च बचत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com