

ATS action
solapur sakal
सोलापूर : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने बंदी घातलेल्या ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला पुणे 'एटीएस'ने अटक केली आहे. जुबेर हंगरगेकर (वय ३५) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा सोलापूर शहरातील रहिवासी असून, सात वर्षांपूर्वीच तो पुणे येथील कोंढवा भागात राहायला गेला आहे. जुबेर १८ ते २० ऑक्टोबरपर्यंत सोलापुरात होता. या काळात वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारीजवळील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील कार्यक्रमात जुबेर व त्याचे मित्र सहभागी झाले होते, अशी माहिती आता पुढे आली आहे. तपासाच्या अनुषंगाने वळसंग पोलिसांनी आता त्या शाळेचे प्राचार्य व शिक्षकांना चौकशीसाठी बोलावले आहे.
जुबेरच्या लॅपटॉपमध्ये ‘अल-कायदा’शी संबंधित साहित्य डाऊनलोड केलेले आढळले आहे. जप्त उपकरणांचा सध्या डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे. न्यायालयाने जुबेरला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मूळचा सोलापूरचा असलेला जुबेर हा कल्याणी नगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. ‘अल-कायदा’च्या सदस्यांशी जुबेरचा काही संबंध होता का?, त्या अनुषंगाने पोलिस जुबेरच्या मित्रांचीही चौकशी करीत आहेत. त्यासाठी जुबेरकडील मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जात आहे. तसेच तो ‘अल कायदा’शिवाय इतर कोणत्या दहशतवादी संघटनेशी संपर्कात होता का? याचीही चौकशी सुरू आहे.
आता जुबेरच्या मित्रांची चौकशी; ‘एटीएस’चे पथक येणार सोलापुरात
जुबेरकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले आहे. तसेच ‘अल कायदा इन्स्पायर’ मासिकातील एके-४७ रायफलने गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याची पद्धत, याचे छायाचित्र व माहितीदेखील सापडली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर-जिल्ह्यातील व अन्य जिल्ह्यांमधील किती कट्टरतावादी तरुण मुले जुबेरच्या संपर्कात आहेत, त्याचे सोलापूर शहरात, मोहोळ, वळसंग अशा भागात कोणाकोणाशी जास्त संपर्क होता, याची माहिती पोलिस काढत आहेत. त्या अनुषंगाने दहशतवादविरोधी पथक (एटीएस) सोलापुरातही येऊ शकते.
कुंभारीजवळील शाळेच्या कार्यक्रमात काय बोलला जुबेर?
वळसंग पोलिसांच्या हद्दीतील कुंभारीजवळील इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेतील कार्यक्रमासाठी जुबेर आला होता. शाळेच्या कॅम्पसमधील त्या कार्यक्रमासाठी परवानगी नव्हती. विद्यार्थ्यांना भविष्याचे शैक्षणिक धडे देण्याच्या या कार्यक्रमाची कार्यक्रमपत्रिका पोलिसांनी मिळविली आहे. तीन दिवस जुबेर या कार्यक्रमास उपस्थित होता. त्या कार्यक्रमात जुबेर काय बोलला?, त्याठिकाणी जुबेरचे कोणते मित्र उपस्थित होते?, त्यांच्याशी जुबेरचे काय बोलणे झाले?, या बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
वार्षिक २५ लाखांचे पॅकेज, तरीही दहशतवाद्यांशी संबंध
जुबेर उच्चशिक्षित असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. पुणे येथील एक आयटी कंपनीत त्याला सुमारे २५ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज होते. वार्षिक भरभक्कम पॅकेज असतानाही तो दहशतवादी संघटनांच्या संपर्कात कसा आला?, याचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच जुबेरच्या संपर्कात आणखी कोण आहेत?, याचाही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.