चोरलेल्या दुचाकी मोजणेही सोडले; चोरांची कबुली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

मुंबई : "इतक्‍या गाड्या चोरल्या आहेत; की मोजणे कधीच सोडून दिले आहे. बाकीच्या गाड्या कुठे आहेत ते आठवत नाही,' असे सांगणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. मुंबई व परिसरातून चोरलेल्या 26 दुचाकी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

मुंबई : "इतक्‍या गाड्या चोरल्या आहेत; की मोजणे कधीच सोडून दिले आहे. बाकीच्या गाड्या कुठे आहेत ते आठवत नाही,' असे सांगणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. मुंबई व परिसरातून चोरलेल्या 26 दुचाकी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

मेहराज अब्दुलबारी शेख (19) व मुस्ताक लालबाबू मन्सुरी (20, दोघेही रा. मानखुर्द) अशी त्यांची नावे आहेत. चार वर्षांपासून दुचाकी चोरत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. मुंबईत "ऍक्‍टिव्हा' स्कूटर मोठ्या प्रमाणात चोरीला जात असल्याच्या तक्रारी आहेत. या दुचाकीला मोठी मागणी असल्यामुळे चोरी करत असल्याचे आरोपींच्या चौकशीतून पुढे आले आहे. या दोघांनी यलोगेट परिसरातून नुकतीच एक ऍक्‍टिव्हा स्कूटर चोरली होती. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या शिवडी पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे परिसरातून अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरलेली दुचाकी गॅरेजचालकांना किंवा बनावट कागदपत्रे बनवणाऱ्यांना देऊन दहा हजार रुपये घेत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. 

पालिका वाहनतळाचा वापर 

गर्दीच्या भागात उभी केलेली दुचाकी शेख व मन्सुरी अवघ्या तीन मिनिटांत चोरून न्यायचे. त्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी ते चोरलेली दुचाकी महापालिकेच्या सशुल्क वाहनतळावर नेऊन उभी करायचे. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आतापर्यंत 26 दुचाकी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे चोरलेल्या अनेक दुचाकी कुठे उभ्या केल्या आहेत, हेही त्यांना आठवत नाही. 

Web Title: Bike Thieves Arrested and accepted the crime