esakal | ‘मी मारल्यासारखे करतो, तू लागल्यासारखे कर’; ठाकरे सरकारवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

‘मी मारल्यासारखे करतो, तू लागल्यासारखे कर’; ठाकरे सरकारवर टीका

‘मी मारल्यासारखे करतो, तू लागल्यासारखे कर’; ठाकरे सरकारवर टीका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, पदाधिकारी रोज एकमेकांवर आरोप करतात. त्यातून ‘मी मारल्यासारखे करतो, तू लागल्यासारखे कर’ असे सुरु असून तीन पक्षाचे नेते रोज सकाळी कोणी कोणावर आरोप करायचे हे ठरवतात व पुढे ‘गेम’ सुरु होतो,’’ असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केला. जनता रोजच्या आरोप-प्रत्यारोपांना वैतागली असून निवडणुकांची वाट पाहत असल्याचा दावाही त्यांनी केला.

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक आढावा घेण्यासाठी पाटील नाशिकच्या दौऱ्यावर आले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रोज वेगवेगळे आरोप करत आहेत. परंतु हे सर्व ठरवून सुरु असते, असे ते म्हणाले. शुक्रवारी (ता.१६) रात्रीपर्यंत ‘ईडी’कडून कोणाला तरी अटक होईल असा दावा पाटील यांनी केला होता. मात्र तसे न झाल्याबद्दल विचारले असता त्यांनी यू-टर्न घेत कोणाला अटक होईल, याचे नाव घेतले नसल्याचे सांगितले. अनेकांची चौकशी सुरु असून, ते अटकेच्या दिशेने आहेत, असा दावाही त्यांनी पुन्हा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांची ‘सीबीआय’ चौकशीच्या मागणीसाठी कोणीतरी न्यायालयात गेले आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनाही न्यायालयाने फटकारले असून माजी मंत्री संजय राठोड यांचे देखील एक प्रकरण प्रलंबित आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याची चौकशी सुरु असल्याचे दाखले त्यांनी दिले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मालमत्ता सील करण्याची कारवाई ‘ईडी’ने केली आहे. आर्थिक अनियमितता झाल्याने ही कारवाई आहे. जरंडेश्‍वर साखर कारखान्याच्या निमित्ताने इतर कारखान्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी मी स्वत: केली आहे. यापूर्वी अण्णा हजारे यांनी देखील मागणी केल्याचे पाटील म्हणाले.

हेही वाचा: मुंबईत पावसाचा हाहा:कार, 14 जणांचा मृत्यू

वेळा जुळल्या की चहा घेऊ

मनसे व भाजपच्या युतीबाबत पाटील म्हणाले, ‘‘राज ठाकरे व माझे व्यक्तिगत संबंध आहेत. त्यांची अन्‌ माझी वेळ जुळल्यास सोबत एक कप चहा घ्यायला हरकत नाही. नाशिकमध्ये मनसे-भाजप युती होईल की नाही याबाबत सांगता येणार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट नियमित स्वरुपाची आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासंदर्भात काही चर्चा झाली असेल असे मला वाटत नसल्याचे ते म्हणाले.

loading image