राज्यात ‘ऑपरेशन लोटस’

bjp
bjp

मुंबई - शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन होणार, अशी परिस्थिती असताना अत्यंत नाट्यमयरीत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या साथीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर सत्तास्थापनेचा जादुई १४५ हा आकडा गाठण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. कर्नाटकप्रमाणे येथेही ‘ऑपरेशन लोटस’ भाजपकडून राबवले जाणार आहे. दुसरीकडे भाजपच्या विरोधातील तिन्ही पक्षांनी एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत.

भाजपने आज आपल्या आमदारांची बैठक मुंबईत बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींनी मार्गदर्शन केले. यानंतर राज्यात कोणत्याही परिस्थितीत आपलेच सरकार राहणार, असा आत्मविश्‍वास या नेत्यांनी वाढवला. 

यानंतर झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत आगामी रणनीतीवर चर्चा झाली. विधिमंडळात १४५ हा सत्तास्थापनेचा आकडा पार करण्यासाठी ‘ऑपरेशन लोटस’ राबविण्यात येणार आहे. त्यासाठी काही नेत्यांवर ठराविक जबाबदारी दिली आहे. यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांची मदत घेण्यात येत आहे.  विधिमंडळात ४८ तासांत बहुमत सिद्ध करायचे झाले, तर त्यासाठी आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी कोणतीही जोखीम घेण्याची भाजपची तयारी असल्याचे सांगितले जाते. अपक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचे आमदार गळाला लावण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याची मोहीम सुरू केल्याचे सांगण्यात येते. 

भाजपचे १०५ आमदार आहेत. भाजपचे बंडखोर आणि अपक्ष यांची संख्या पाहता भाजपकडे ११९ चे संख्याबळ आहे. तर आणखी २६ आमदार कमी पडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यामुळे भाजपला बळ आले असून, अजित पवार यांच्या बाजूने सभागृहात २५ पेक्षा जास्त आमदार सोबत घेऊन येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे ऑपरेशन लोटस जोरात राबविले जाणार असल्याचे भाजपमधून सांगण्यात येते.

कोळंबकर हंगामी अध्यक्ष?
नव्या विधिमंडळात हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी कालिदास कोळंबकर यांच्यावर सोपवण्यात येऊ शकते. सभागृहातील सर्वांत ज्येष्ठ सदस्याला त्या संदर्भातले अधिकार देण्यात येतात. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे आठव्यांदा निवडून आले आहेत. भाजपचे कोळंबकर हेही आठव्यांदा निवडून आले आहेत. 

‘व्हीप’ कोणाचा ग्राह्य?
बहुमत सिद्ध करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य कोणाच्या पारड्यात मत टाकतील यावर सर्व गोष्टी अवलंबून असतील. राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांचा ‘व्हीप’ योग्य असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्षांनी दिला, तर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना त्याचे पालन करावे लागेल. न केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते. दुसरीकडे अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीने जयंत पाटील यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. तसे ४१ आमदारांच्या सह्यांचे पत्र राजभवनाला पाठविले आहे. त्यामुळे जयंत पाटील यांची नेमणूक ग्राह्य धरल्यास भाजपच्या अडचणी वाढतील. अशावेळी आपल्याबरोबर ३६ सदस्यांचा गट असल्याचे अजित पवार यांना सिद्ध करावे लागेल, तरच पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणार नाही.

यांच्यावर जबाबदारी
    भाजप आमदारांना एकत्र ठेवणे - आशिष शेलार व प्रसाद लाड
    अपक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे आमदार गळाला लावणे - नारायण राणे, गणेश नाईक, बबन पाचपुते, प्रसाद लाड

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच कायम आहे. शरद पवार हेच माझे नेते आहेत. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थिर सरकार असेल. कुणीही घाबरण्याचे कारण नाही. थोडा संयम ठेवण्याची आवश्‍यकता आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

अजित पवार यांचे विधान दिशाभूल करणारे आहे. ते संभ्रम निर्माण करत आहेत. आम्ही भाजपसोबत जाण्याचा प्रश्‍नच नाही. सरकारचे नेतृत्व शिवसेना करणार असल्याचे तिन्ही पक्षांत ठरले आहे.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com