भाजपचंही दिल्लीत ठरलंय, 'या' दोन गोष्टींवर अजिबात तडजोड नाही!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 November 2019

मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदावर कुठल्याप्रकारे तडजोड करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. सहा कृष्णमेनन मार्ग या अमित शहा यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीवेळी राज्यातून आणि दिल्लीतून कोणीही उपस्थित नव्हते या दोघांमध्येच ही चर्चा झाली.  या चर्चेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदावर कुठल्याप्रकारे तडजोड करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात निकाल लागून तब्बल 11 दिवस उलटूनही सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. सरकार स्थापनेच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या कोंडीवर फडणवीस यांनी आज (ता.04) दिल्‍लीतही मौन बाळगले. मात्र, याचवेळी राज्यात नवे सरकार बनण्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. सरकार स्थापनेच्या मुद्यावर फडणवीस यांनी शहा यांची भेट घेत खलबते केली, मात्र महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम आहे.

राज्यात युतीचे सरकार बनवायचे असेल, तर शिवसेनेने अडेलतट्टूपणाची भूमिका सोडून चर्चा सुरु केली पाहिजे, अशी भाजपची भूमिका असून मुख्यमंत्रीपद तसेच गृहमंत्री आपल्याच पक्षाकडे राहील, यावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे. मावळत्या विधानसभेची मुदत 9 तारखेला संपत आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत सरकारची स्थापना होणे आवश्यक आहे. अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांची भेट घेत त्यांच्याशीही खलबते केली.  

चर्चा आम्ही नव्हे, तर शिवेसेनेने बंद केली आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा शब्द बिलकुल नव्हता असेही भाजपच्या गोटात सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सत्तापेच अजूनही कायम राहणार असल्याचे स्पष्ट आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP has decided in Delhi, there is no compromise on CM and Home Minister Post with shivsena