चंद्रकांत पाटील म्हणतात, 'जयंत पाटील शिवसेनेचे वकील आहेत का?' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 डिसेंबर 2019

सरकार नियमबाह्य आणि बैठकही 

कर्जमाफी फसवी 

पुणे : 'जयंत पाटील हे शिवसेनेचे वकील आहेत का? सत्तेत राहण्यासाठी किती वकिली करावी, याला काही हद्द आहे की नाही', असा प्रश्‍न आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस हे सरकार नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 25 वर्षे फसवणूक केली, असे वक्‍तव्य अर्थ व नियोजनमंत्री जयंत पाटील यांनी केले होते. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, "आम्ही 25 वर्षे फसविले असेल तर त्याबाबत शिवसेना बोलेल आणि फसविले तरी शिवसेना आमच्यासोबत कशी राहिली? 1995 मध्ये युतीच्या सत्तेत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होता. आता आम्ही सत्तेत नसलो तरी आमचे रक्‍त एकच आहे. आमच्यातील भांडण आम्ही सोडवू. जयंत पाटील यांनी वकिली करण्याचे कारण नाही'. 

धक्कादायक : केंद्रीय मंत्री म्हणतात, भारत माता की जय म्हणणारेच देशात रहातील

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मातोश्रीबाहेर कॅमेरे लावले होते, हे चंद्रकांत पाटील यांना माहीत नव्हते का, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. या मुद्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंत पाटील यांनी हा शोध लावला असेल. राष्ट्रवादी काँग्रेस एकूणच हे सरकार नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला देऊ नका, दिल्यास ते मातोश्रीवर कॅमेरे लावतील, असा सल्ला मी मित्रत्वाच्या नात्याने उद्धव ठाकरे यांना दिला होता. परंतु उद्धव यांनी मातोश्रीवर कॅमेरे लावले तरी चालतील, असे सांगितले. त्यावर माझे काय जातंय, असे पाटील यांनी नमूद केले. 

सरकार नियमबाह्य आणि बैठकही 

"राज्य सरकार हे नियमांच्या बाहेर काम करीत आहे. 12 जणांच्या खाली मंत्रिमडळ असू शकत नाही. त्यामुळे ते सर्व रद्द ठरतात. परंतु या सरकारने निर्णयाचा सपाटाच लावला आहे. अजित पवार हे कोणत्या अधिकाराखाली कालवा सल्लागार समितीची बैठक घेत आहेत. ज्यांच्याकडे जलसंपदा खाते आहे, त्यांनी बैठक घ्यायला हवी होती', अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. 

कर्जमाफी फसवी 

राज्य सरकारने केलेली कर्जमाफी फसवी आहे. ही कर्जमाफी शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारी नाही. या कर्जमाफीने शेतकऱ्यांचे भले होणार नाही. तर, ज्या साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्जे काढली आहेत. त्यांना कर्जमुक्‍त करण्याचा हा प्रयत्न आहे', अशी टीका त्यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Leader Chandrakant Patil Criticizes on NCP Leader Jayant Patil